जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय
नाशिक

समुपदेशनाचा पाच हजार जणांना लाभ

जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षच सुरू

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा शासकीय रूग्णालय येथे करोना बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी सुरु केलेली टेली काउंसेलिंग सुविधा उपयुक्त ठरली आहे. आतापर्यंत पाच हजार पेक्षा अधिक जणांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांतच अधिक भीती असल्याने त्यांचेही समुपदेशन करण्यात आले आहे. आता समुपदेशनासाठी मागील आठवड्यापासून स्वतंत्र कक्षच सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.

करोनाच्या भितीदायक परिस्थितीतून जाताना सर्वांच्या मनोवस्थाही बदलत गेल्या. गेलेला रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न, केवळ घरात थांबून राहाणे भाग पडल्याने तसेच करोना संसर्गाची भीती यामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला. लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा पासून सिव्हील हॉस्पिटल मधील मानसोपचार विभागाने शेल्टरसह विविध ठिकाणी समुपदेशनाची सेवा देण्याचे काम केले आहे. आताही थेट सिव्हील हॉस्पिटलच्या कोविड इमारतीमध्ये जाऊन रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम समुपदेशकांद्वारे सुरू आहे.

आपल्याला करोना संसर्ग झालाय ही भीतीच रुग्णांना अधिक अस्वस्थ करीत आहे. त्यांच्या मनात नेमके काय चाललेय हे समजून घेणे आणि त्यानुसार त्यांच्या मध्ये सकारात्मक दृष्टिकोण पेरण्याचे काम स्वाती चव्हाण, गोपाल घोडके, हुकूमचंद अगोने, गौरव शितोळे, सायली बोन्द्रे, अरविंद पाईकराव, शीतल अहिरराव, वैशाली पाटील या समुपदेशकांमार्फत सुरू आहे.

जिल्हा रूग्णालयाच्या कोविड इमारतीमध्ये प्रकृती गंभीर असलेले पॉझिटिव्ह रुग्ण दाखल केले जातात. त्यामुळे रुग्णाच्या एका नातलगाला कोविड इमारतीच्या आवारात थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु कुटुंबातील व्यक्ती बाधित आल्याने नातलगांचेही मनोधैर्य खच्ची होत आहे. त्यामुळे रुग्णांपेक्षा त्यांच्या नातलगांचेच अधिक समुपदेशन करावे लागत असल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांनी दिली आहे.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी काय काळजी घ्यायला हवी याबाबतचे समुपदेशन करण्याचे काम चार समुपदेशक करीत आहेत. पीपीई किटसह सुरक्षेबाबतची सर्व खबरदारी घेऊन ते रुग्णांशी संवाद साधत आहेत.

करोना झालाय याचीच खूप मोठी भिती रूग्णामध्ये असते. उपचार सुरू झाले की रुग्ण सावध होतात. परंतु आम्हाला रुग्णांच्या नातेवाईकांचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अधिक काम करावे लागते आहे. दीर्घ श्वसनाचे व्यायाम, शवासन यासारखे योग आम्ही त्यांच्याकडून करवून घेतो. रोना संसर्गाची सुरुवात झाली तेव्हा पासून आतापर्यंत आम्ही पाच हजारहून अधिक जणांचे समुपदेशन केले आहे.

डॉ. निलेश जेजुरकर, वैद्यकीय अधिकारी मानसोपचार तज्ज्ञ

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com