ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बेडस् राखीव ठेवावे

जि.प. अध्यक्ष क्षीरसागर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बेडस् राखीव ठेवावे

नाशिक । प्रतिनिधी

ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील खासगी असो की, शासकीय रूग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होते.यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात चारशे बेड करून त्यातील 200 बेडस हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी राखीव ठेवावे,अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.

अध्यक्ष क्षीरसागर यांनी पालकमंत्री भुजबळ यांची भेट घेत ही मागणी केली. जिल्हयात ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. ग्रामीण भागात उपचार घेणार्‍या व अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले असता बेड उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील गोर-गरिब करोना रुग्णांची हेळसांड होते.

परिणामी, ग्रामीण भागात अत्याधुनिक अत्यावश्यक कोविड रुग्णसेवा रुग्णांना उपलब्ध होत नाही. याबाबत ग्रामीण भागातील अत्यवस्थ असलेले कोविड रुग्ण यांना रुग्णालयीन अतितात्काळ उपचार मिळण्याबाबत रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक हे जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांना दाखल करुन घेण्याबाबत मागणी करतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकुण 650 बेड उपलब्ध असून पैकी 200 हे कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

जिल्हयातील ग्रामीण भागातील कोविड रुग्णांचा वाढता आलेख बघता जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर आजारांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार्‍या उर्वरीत 450 बेडपैकी 200 वाढीव बेड हे कोविड रुग्ण बेड म्हणून कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत. तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात 200 कोविड बेड वाढवून 400 कोविड बेड करण्यात येऊन वाढविण्यात आलेले 200 कोविड बेड हे ग्रामीण भागातील कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com