पतंग उडवताना सावधगिरी बाळगा

महावितरणकडून सतर्कता, सुरक्षिततेचे आवाहन
पतंग उडवताना सावधगिरी बाळगा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मकरसक्रांतीनिमित्त( Makarsankranti Festival-2023) पतंगोत्सव ( Kite Festival)साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून (Mahavitaran )करण्यात आले आहे.

संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये. मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करत पतंग उडविताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो.मांजा ओढतांना एका तारेवर दुसर्‍या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे प्राणांकीत अपघात होवून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होवू शकतो.

प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. नायलॉन मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे कुठलाच मांजा वापरु नये.

नागरिक आणि लहान मुलांनी वीज वाहिन्या,वीज यंत्रणा असलेल्या परिसराएवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे व सोबत राहावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वादळ वारा व पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात.त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सतर्कता व सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता तसेच संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या कार्यालयाशी किंवा तसेच महावितरणच्या 24/7 सुरु असणार्‍या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com