खते, बियाणांचा तुटवडा टाळण्याची खबरदारी घ्या

आढावा बैठकीत पालकमंत्र्यांकडून अधिकार्‍यांना सूचना
खते, बियाणांचा तुटवडा टाळण्याची खबरदारी घ्या

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

शेतकर्‍यांना खते, बियाणांचा ( fertilizers and seeds ) तुटवडा जाणवणार नाही याची काळजी कृषी अधिकार्‍यांनी घेऊन शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संंकट येवू नये, यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच कर्ज वितरणाबाबत शेतकर्‍यांना सहकार्य करा अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांंनी आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.

करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. अधिकार्‍यांनी देखील लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये. सोशल डिस्टन्स पाळून मास्कचा वापर करावा. लग्नसोहळे व घरगूती सोहळ्यात गर्दी करू नका. पोलीस प्रशासनाने देखील याबाबत काळजी घेतली पाहिजे. येथील स्वामी मंगल कार्यालयात आयोजित निफाड, येवला तालुका आढावा बैठकीप्रसंगी भुजबळ बोलत होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व त्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यात यावा. तसेच लसीकरण केंद्रे वाढविण्याचे नियोजन करावे. ऑक्सिजन जनरेशन प्लँटच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावेत. शासकीय रूग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया करण्यात यावी. जिल्ह्यातील लसीकरणाच्याअनुषंगाने आवश्यक नवीन लसीकरण केंद्र स्थापन करून केंद्राची संख्या वाढवावी.

लसींची उपलब्धता लक्षात घेवून ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली आहे त्यांना दुसरी लस देण्याची पूर्तता प्रामुख्याने करण्यात यावी. लग्नसमारंभास परवानगी देतांना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन होणे अधिक गरजेचे असून या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन होते किंवा नाही हे पोलीस यंत्रणेने तपासणे गरजेचे आहे. तालुक्यात व शहरात गृहविलगीकरणात ठेवलेल्या रूग्णांची वेळोवेळी तपासणी करावी.

ज्या गृहविलगीकरणात रूग्णांची व्यवस्था पुरेशी नसेल अशा रूग्णांना तातडीने रूग्णालयात स्थलांतरीत करण्यात यावे. करोनासोबत आता म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस व लॅमडा या नवीन आजारांचे आगमन होत असतांना प्रत्येकाने स्वत:बरोबर कुटुंबाची काळजी घ्यावी. बाजार समित्यांनी प्रवेश द्वारावर तपासणी केल्याशिवाय बाजार समितीत प्रवेश निषिध्द करावा असेही भुजबळ म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करून सदर रस्त्याच्या उड्डाणपूलाचे काम व रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. याप्रसंगी निफाड व येवला तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपिठावर मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, जि. प. चे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र भवर, दत्तात्रेय डुकरे, दत्ता रायते, शिवाजी सुपनर, भाऊसाहेब बोचरे, शिवाजी जाधव, विनोद जोशी, निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे उपविभागीय अधिकारी कासार, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी खैरे,

गटविकास अधिकारी संदीप कराड, डॉ. उन्मेश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, येवला बाजार समिती प्रशासक वसंत पवार, शाखा अभियंता गणेश चौधरी, उपअभियंता गोसावी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहूल वाघ आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com