नाशिक | प्रतिनिधी

ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना नाशिक येथे घरी आलो असता 5 एप्रिल 2020 ला मला ताप आला आणि घशाला सुज आली. दोन दिवस वाट पाहून डॉ. जाकिर हुसेन रूग्णालयात करोना चाचणी केली. 10 एप्रिलला चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे लगेच अपोलो रूग्णालयात दाखल झालो. परंतु माझी प्रकृती खालावत गेली. सर्व कुटुंबिय, मित्र परिवार मानसिक तणावात होता. तर मलाही शारीरिक तसेच मानसिक त्रास होत होता.

प्रकृती खूपच खालावल्यानंतर पोलीस प्रशासनानेच मला तत्काळ 14 ला मुंबई येथील सेव्हन हिल रूग्णालयात हलवले. परंतु प्रकृती इतकी खालावली की जगेन की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. डॉक्टरांनीही आशा सोडून दिली होती. सर्व कुटुंबिय धक्क्यात होते. सर्वांचे सहकार्य डॉक्टरांचे प्रयत्न व सर्वांची प्रार्थना यातून मी वाचलो.

परंतु दुसरीकडे माझ्या मुळे निवासस्थान असलेल्या धोंडगेमळा परिसरात सर्व बाजुंनी 500 मिटर अंतरावरचा परिसर सील करण्यात आला होता. यामुळे त्या भागातील नागरिकांचा रोष माझ्यावरच होता. मी एक पोलीस अधिकारी असूनही मला शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे खूप सहकार्यही झाले. परंतु या त्रासातून ना मंत्री सुटले ना डॉक्टर तर सामान्यांची गत काय असणार आहे.

मी या सर्व त्रासातून गेलो आहे. मी भोगले आहे. अशी वेळ कोणावरच येऊ नये ही मनोमन प्रार्थना आहे. परंतु या बरोबरच मी कळकळीने विनंती करतो की, कोणीही आपणास करोना होणार नाही या अविर्भावात राहू नये, मास्कचा कटाक्षाने वापर करा, सामाजिक अंतर पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, स्वच्छता पाळा आणि स्वःताबरोबर कुटुंबियांची काळजी घ्या.

मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक