
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ( APMC Nashik )भ्रष्टाचाराबद्दल दिनकर पाटील व सुनील केदार यांनी भारत सरकारच्या प्रवर्तन निदेशालयाकडे (ईडी) माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात सुनावणी पूर्व आरोपांच्या समर्थनार्थ ठोस पुरावे सादर करण्याची सूचना तक्रारदारांना करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सुमारे 44 मुद्यांचा सविस्तर अहवाल काल ईडीकडे सादर करण्यात आला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध कामांमध्ये आर्थिक हेतूने भ्रष्टाचार केल्याचा विविध 44 मुद्यांवर दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे, सुनील केदारे यांनी 12 जानेवारी 2022 रोजी देवीदास पिंगळे यांच्याविरोधात भारत सरकारच्या प्रवर्तन निदेशालयाकडे भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
त्या अर्जावर काल निदेशालयाने दोन्ही तक्रारदारांना या प्रकरणाच्या पुष्ट्यर्थ सबळ पुरावा सादर करण्याची मागणी सहाय्यक निदेशक वेंकट नरेश गारपाठी यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यात प्रामुख्याने बँकेच्या खात्यांचा सविस्तर अहवाल, भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मालमत्तेची सविस्तर माहिती, यासंदर्भात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराबद्दलच्या पोलीस तक्रारींची माहिती व इतर सबळ पुरावे देण्याची मागणी करण्यात आली. या आशयाचे पत्र नुकतेच तक्रारदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी प्राप्त झाले होते.
पत्र प्राप्त होताच पाटील, चुंभळे, केदारे यांनी सर्व तक्रारींच्या मुद्याचे सबळ पुरावे देताना विविध 44 मुद्यांच्या विश्लेषणासह सादर केले असून हे प्रकरण लवकरच निकाली निघून आरोपींवर कारवाई होईल, असा विश्वास दिनकर पाटील यांनी व्यक्त केला.