साल्हेरचा रणसंग्राम

दै. 'देशदूत' मालेगाव विभागीय कार्यालय वर्धापन दिन विशेष-२०२२
साल्हेरचा रणसंग्राम

- रोहित माणिक जाधव (गडसेवक )

बागलाण ( Baglan ) प्रांतात मुघलसैन्याने उच्छाद मांडला होता. प्रजा कंटाळून गेली होती. मंदिरे तर अखेरच्या घटका मोजत होते. जेथे माणसे सुरक्षित नव्हती, तेथे मंदिरे ( Temples )आणि देवतांची काय दशा? एकीकडे मुघलांचा अत्याचार सुरु असतांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हिंदवी स्वराज्याचे पडघम वाजत होते. शककर्ते छत्रपती शिवराय महाराष्ट्रभूमी वेदनामुक्त करीत होते. मराठ्यांचे घोडे घाटवाटा तुडवित त्वेषाने पापी यवनांच्या तावडीतून गडकोट मुक्त करीत स्वराज्य वाढवित होते. बागलाणच्या भूमीलाही आता पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वराज्य पाहायचे होते...

बागलाण मुघल ( Mughals )शासनाच्या केंद्रीय नियंत्रणाखाली होता, त्या काळी औरंगजेबाची विशेष मर्जी बागलाणातील मुल्हेर व साल्हेरवर होती. हे गड म्हणजे गुजरातवर लक्ष ठेवण्यासाठी जणू आधारस्तंभच. म्हणून औरंगजेबाने मुल्हेरचे नाव बदलून त्यास स्वतःचे नाव दिले होते औरंगगड तर साल्हेरचे नाव सुलतानगड ठेवले होते. मोघली सैन्याने बागलाण प्रांतात उच्छाद मांडला होता. प्रजा कंटाळून गेली होती. मंदिरे तर अखेरच्या घटका मोजत होते. जेथे माणसे सुरक्षित नव्हती, तेथे मंदिरे आणि देवतांची काय दशा? एकीकडे मुघलांचा अत्याचार सुरु असतांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हिंदवी स्वराज्याचे पडघम वाजत होते. शककर्ते छत्रपती शिवराय महाराष्ट्रभूमी वेदनामुक्त करीत होते. मराठ्यांचे घोडे घाटवाटा तुडवित त्वेषाने पापी यवनांच्या तावडीतून गडकोट मुक्त करीत स्वराज्य वाढवित होते.

बागलाणच्या भूमीलाही आता पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वराज्य पाहायचे होते. बागलाणची भूमी देवदेवतांचे नाद, स्वर, भजन ऐकण्यास आतुर झाली होती. बागलाणचे गडकोट रडत होते आणि चिडतही होते. अखंड 1600 वर्षे विजय बघितलेले साल्हेर-मुल्हेर किल्ले पेटून उठले होते. त्यांच्यावरील पारतंत्र्याची पताका त्यांना जास्तच डिवचत होती. ज्या दगडी शिल्प मंदिरातून पूर्वी शीतलतेचा सुगंध दरवळायचा, तेथे आता कुर्‍हाडी कोसळत होत्या. मंदिरातील नंदी, भिंतींवरील शिल्पे संतापले होते. बागलाण भूमीतील ताम्र अत्याचार पाहून बागुल, राठोडवंशीय भैरवशहा-नारायणशहा राजे चिडत होते.

कपारीतल्या भवानीने अक्राळविक्राळ रुप धारण केले होते. अखेर सर्वांच्या भावनांचा बांध फुटला. नियती चित्कारुन पेटून उठली. हिंदवी स्वराज्याचे घोडे बागलाणकडे कूच करु लागले. साक्षात् छत्रपती शिवाजी महाराज बागलाण मुक्त करायला येत आहेत, अशी बातमी पसरली. एक नवे चैतन्य सर्वत्र पसरले. जी मनगटे व हत्यारे पूर्वी बळजबरीने मुघली सत्तेकरता वापरली जात होती, ती आता स्वराज्य निर्मितीसाठी आसुसली होती. अखेर तो दिवस उजाडला... साधारणत: अश्विन-कार्तिकचे दिवस होते. थंडी पडत होती. बागलाणची थंडी तशी हुडहुडी आणणारी. पण पाड्या-पाडयांवर, गावकुसात शेकोटीवर बसून राजा येनार स... ही कुजबुज... सूर्यमंडळ जणू ह्याच दिवसाची वाट बघत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj )1670 साली दुसर्‍या सुरत स्वारीची मोहीम उघडली. सोमवार, अश्विन शुक्ल पौर्णिमा शके 1592, 29 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण होते. त्यारात्री बागलाणातील आदिवासी राजांचा म्होरक्या करोलीचा दामा राजा, रामनगरचा राव तुळाराम शहा हा कोळी राजा बोरखेल येथे शिवाजी महाराजांना जाऊन भेटला. दामा राजाने लुटीचा माल वाहून ने-आण करण्याकरिता बैलगाड्यांची व्यवस्था केली होती. दामा राजाचे संस्थान सुरतेपासून 35 मैलावर होते. त्यांच्या भिल्लांच्या तुकडीने 1 ऑक्टोबर 1670 रोजी सुरतेच्या समुद्रावरील बंदर फोडले. सर्व जहाजे बांधून ठेवली आणि अचानक शुक्रवार अश्विन कृ. 5-1592, 3 ऑक्टोबर 1670 रोजी भल्या पहाटे सूर्य नुकताच उगवला असताना सुरतेवर हल्ला चढवला.

तीन दिवस यथेच्छ सुरत बदसुरत करून महाराजांनी त्यांच्या जवळील 10 हजार सैन्य भडोचच्या दिशेने पाठवले व महाराज स्वतः पेठच्या दिशेने निघाले. भडोचची दशा सुरतसारखी नको व्हायला म्हणून बागलाणसहित खान्देशातील सर्व मोघली सैन्य भडोचच्या दिशेने जाऊन थांबले. महाराजांना हेच पाहिजे होते. भडोचच्या दिशेने निघालेले मराठा सैन्य रुपगड-सोनगडमार्गे अहवाकडून बाभुळणेमार्गे मुल्हेरला आले. तेथेच विरखेल बारीमार्गे महाराजांचे सैन्य त्यांना मिळाले. तेथून त्यांनी कोंढराबाद, शाहबाग ही मुल्हेर जवळील मुघली व्यापारी गावे सुद्धा हस्तगत केली. तेथून पांघरुण बारीमार्गे मराठा सैन्य चौल्हेरकडे सरकले. त्याकाळी चौल्हेरवरील विक्रम शहा हा राजा मुघलांचा मंडलिक असला तरी महाराजांचा मित्र होता. महाराज चौल्हेर गडावर मुक्कामी थांबले. तेथून सैन्याच्या दोन तुकड्या करून प्रतापराव गुजर ह्यांना लुटीचे ऐवज घेऊन राजदेहेर गडाकडे पाठवले.

शुक्रवार, कार्तिक शु. चतुर्दशी 1592, 17 ऑक्टोबर 1670 रोजी वणी दिंडोरीजवळ, कांचन घाटाजवळ महाराजांची दाऊदखानाशी चकमक झाली. पण महाराजांच्या युद्ध कौशल्यापुढे मुघली सैन्याचा टिकाव लागला नाही. पुढे महाराज कुंजरगडाकडे मुक्कामी निघून गेले. पुढे एक महिना महाराज खान्देश मोहिमेवर गेले. तेथे त्यांनी धरणगाव, चोपडा, कारंजा, बहादूरपूर ही गावे घेतली व तेथील सावकारांना चौथाई नियम बसवून पुन्हा बागलाणात आले. पुढे 23 डिसेंबर 1670 रोजी महाराजांनी अचानक हल्ला करून अहिवंत, रवळ्या, जवळ्या, मार्कंडा हे गड काबीज करून सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. गुरुवार, पौष चतुर्दशी 1592, 25 डिसेंबर 1670 रोजी पुन्हा रात्री साल्हेरच्या पायथ्याशी मोरोपंत पिंगळे ह्यांच्या सैन्यासोबत एकत्रित झाले.

लगेच 20 हजार सैन्यासह साल्हेर किल्ल्याला वेढा दिला. शुक्रवार, पौष पौर्णिमा 1592, 26 डिसेंबर 1670 च्या पहाटे पेशवे मोरोपंत पिंगळे शिडीच्या मार्गे साल्हेर किल्ल्यावर पोहचले. त्यावेळी फतेउल्लाखान हा किल्लेदार होता. त्या चकमकीत तो ठार झाला. त्यावेळी त्याच्या बायकोच्या भावाने साल्हेर किल्ला मराठ्यांकडे सुपूर्द केला. साल्हेरीवर तब्बल 40 वर्षांनंतर भगवा ध्वज फडकू लागला. शिवाजी महाराज हत्तीच्या सोंडेमार्गे गडावर पोहचले. तो श्री साल्हेरचा पहिला विजयच होता.

साल्हेर ( Salher )म्हणजे बागलाणची चावी... त्यामुळे संपूर्ण बागलाण आणि खान्देश महाराजांकडे आला होता. साल्हेरमुळे सुरत शहरावर कायमचा वचक निर्माण झाला होता. साल्हेरची लष्करी व्यवस्था बालपणीचे मित्र सूर्याजीराव काकडे यांच्याकडे सोपवून शिवाजी महाराज निघून गेले. मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान याने औरंगजेबास पत्र पाठवून इकडील सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर औरंगजेब फार संतापला आणि त्याने त्याचा विश्वासू सरदार महाबतखान, दाऊदखान, दिलेरखान यांच्यावर साल्हेरची जबाबदारी सोपवली. महाबतखानाने इखलासखान मियाना या नवाबास साल्हेर मोहिमेवर पाठवले. अशा रीतीने वैशाख 1593, 16 एप्रिल 1671 रोजी महाबतखानाने वेढा घालून पुन्हा मार्कंडा, अहिवंतगड, जवळा, अचलगिरी जिंकून घेतले व 21 जून 1671 रोजी महाबतखान, बहादूरखान, दिलेरखान यांनी साल्हेरला वेढा घातला. हा वेढा साडेचार महिन्यांनंतर उठला.

त्याकाळात मराठा सैनिक गड माथ्यावरून खरकट्या पत्रावळी खाली फेकायचे. त्या खाली मुघली सैनिक मोजायचे. रोजच्या 5 हजार पत्रावळी मोजल्या जायच्या. सारासार विचार करून अखेर वेढा उठला. पण आपली फजिती केली, हे बहादूरखानास कळून आले आणि पुन्हा डिसेंबर 1671 रोजी त्याने साल्हेरभोवती वेढा बसवला. ही बातमी महाराजांकडे पोहचली, तसे वेगाने महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांवर साल्हेरची जबाबदारी सोपवली. त्यात प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रुपाजी भोसले, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, मोरोपंत पिंगळे, तुळाजीराव गायकवाड हे होते. या लढाईचा उल्लेख सभासद बखरीत आला आहे. रोज युद्ध होत होते. परिस्थिती अशी होती कि साल्हेरवर मराठा सैन्य, पायथ्याला मुघली सैन्य आणि त्यामागे पुन्हा मराठा सैन्य. मुघली वेढ्याचा विस्तार वाघांबे-मगरबारा व पुढे वळसा मारून महारदरपर्यंत पसरला होता. मुघली सैन्य एकूण पन्नास हजारांच्या वर होते. त्यात 6000 घोडे, 3500 उंट, 200 हत्ती, 300 तोफा व 25000 पायदळ होते.

ते दिवस माघ महिन्यातील सुरवातीचे होते. त्यामुळे हवेत फार गारवा होता. वाघांबे बाजूस इखलासखान नवाब ह्याची छावणी पडली. कारण तिकडे बर्‍यापैकी सपाट विस्तीर्ण माथा व नदीचे पात्र होते. आजूबाजूला डोंगरभाग असल्यामुळे थंडी एवढी जाणवत नाही. त्याच्या उलट महारदर येथे थंडी जास्त असल्यामुळे वेढा सैल होता. या युद्धाचे संपूर्ण नियोजन महाराजांनी स्वतः केले होते. त्यामुळे कोणी कुठून यायचे, हे महाराजांनीच ठरवले होते. त्याच तत्परतेने मंगळवार, माघ शुक्ल जया एकादशी, 9 फेब्रुवारी 1672 या शुभ तिथीला प्रतापराव गुजर ह्यांनी महारदरमार्गे पहाटे 4 वाजता सर्व गाढ निद्रेत असतांना बहलोलखानाच्या छावणीवर अचानक हल्ला केला आणि भयानक कापाकापी सुरु झाली.

खानाचा वेढा फोडणे महत्वाचे असल्यामुळे पिसोरेमार्गे हल्ला चढवून सरनौबत मागे फिरले. महारदरचा अख्खा वेढा सैल पडला. मुघली सैन्य मूळ जागेपासून लांब भवाडेपर्यंत पसरत गेले. खाली तळवाडीला दमाराजा, ज्याने महाराजांना सुरत स्वारीवेळी मदत केली होती; त्याच्या सैन्याने मुघल सैन्य कापून काढले. आता प्रतापराव दुसर्‍या घाटवाटेने वर आले आणि तुपविहीर पाड्याच्या मुघल सैन्यावर तुटून पडले. पुन्हा वेढा फोडून पुन्हा माघारी फिरले. अगदी त्याचवेळी कापशी बारीतून सूर्यराव काकडे सायमुखाच्या मुघली सैन्यावर हल्ला चढवून माघारी फिरले. मुघल सैन्य चक्रावून गेले. पश्चिमेकडून सूर्यराव, पूर्वेकडून प्रतापराव, दक्षिणेकडून मोरोपंतांची फौज यामुळे मागील बाजूचा वेढा फुटून मुघल सैन्याची दाणादाण उडाली. बराच गनीम मारला गेला. एकच कल्लोळ उडाला. भयंकर रक्तपात. काही दिसायच्या आत चंदनबारी आणि मगरबारीतून रक्ताचे पाट वाहू लागले... मराठा सैन्याच्या काही तुकड्या मुद्दाम मुघली सैन्याला लांबपर्यंत पळवून घेऊन जायच्या व खिंडीत गाठून काटा काढायच्या. अशा प्रकारे कापशीबारी, सासबारी, पायरीबारी, आंधळीबारी तैलाईबारीपर्यंत सैन्य विखुरले गेले. ही मराठा युद्धाची एक पद्धतच होती.

मुघलांचे बाजारबुणगे व इतर मस्तवाल फौज वाघांबे बाजूस होती. जे वाचले ते तिकडे पळत असताना साल्हेरवरील कमळबारीतील शिबंदीने दगडाचा हल्ला चढवला. त्यात कित्येक ठार झाले. चिंचली गडद मराठ्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे जे मुघली सैन्य खाली पळत गेले असेल त्यांचे काय झाले असेल; याचा नुसता विचारच केलेला बरा... दाही दिशांनी मराठी फौजा तुटून पडत होत्या. मागील बाजूचा वेढा संपलेला होता. आता मराठा सैन्याची एक तुकडी आनंदराव मकाजींच्या नेतृत्वाखाली चाफ्याचापाडा येथे येऊन थांबली होती, संताजी मोरे यांची एक तुकडी तैलाई घाटमार्गे वाघाचीबारी येथे येऊन थांबली होती तर गायकवाडांची एक तुकडी हनुमंतपाडा येथे येऊन थांबली होती. बाकी 10,000 सैन्य किल्ल्यावरील शिबंदीस येऊन मिळाले होते. पहिल्या व दुसर्‍या तुकडीने वाघांबेवर छापा मारून मागे फिरावे आणि तिसर्‍या तुकडीने भिमखेतच्या लष्करी तुकडीवर हमला करून मागे फिरावे; असा क्रम सलग 4 तास सुरु होता.

नेहमीप्रमाणे आंधळीबारीतील सैन्याने जनक महाल वरून दगडांचा मारा करायचा. त्यामुळे मुघल सैन्य पुरते गोंधळून गेले, याच गोंधळात बहलोलखान, मेहेरसिंग हे मुघली सरदार मारले गेले. अचानक मध्ये बातमी यायची कि स्वतः शिवाजी महाराज 50,000 सैन्यासह दक्षिणेकडून सामील होत आहेत. या बातमीने मराठ्यांत जोश संचारायचा. मुघल-मराठा सैन्य समोरासमोर मिळेल त्या हत्याराने लढाई करत होते. प्रचंड कापाकापी सुरु होती. आरोळ्या, किंकाळ्या, तलवारींचा खणखणाट, तोफांचे आवाज, हत्ती, घोडे, उंट यांचे आवाज प्रचंड दुमदुमत होते. या महाभयंकर युद्धाचा पसारा 12 किमीपर्यंत पसरला होता. म्हणूनच सभासद या युद्धाचे वर्णन करतांना म्हणतो कि, चार प्रहर दिवस युद्ध जाहले, मोगल, पठाण, राजपूत, तोफा, हत्ती, उंट, घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला कि तीन कोस औरस चौरस आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले, दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले, रक्ताचे पूर वाहिले, चिखल झाले, त्यामध्ये रुतो लाभले.. असा कर्दम जाहला.. यातच दुपारच्या वेळी जंबुर्‍याचा गोळा लागून सूर्यराव पडले. सभासद म्हणतो, सूर्यराव म्हणजे काही सामान्य योद्धा नव्हे... महाभारती जैसा कर्ण योद्धा त्या प्रतिमेचा वीर पडला ...

आनंदराव मकाजी घोडदळाचे प्रमुख होते, ते शर्त करीतच होते. तोपर्यंत मोरोपंत पिंगळेंनी विजयाचे शंख फुंकून भगवे ध्वज फडकवायला सुरुवात केली. गडावरून ढोलताशे, कर्णे, तुतार्‍या वाजवल्या जाऊ लागल्या. चौथ्या प्रहरी युद्ध संपले. सलग 10 ते 12 तास युद्ध सुरु होते. यात मुघलांचे 10,000 व आपले 2,000 लोक पडले होते. मराठे जिंकले होते... या विजयाची बातमी महाराजांपर्यंत पोहचवणार्‍याला महाराजांनी स्वतःच्या हातातील सोनकडे काढून दिले, इतके महाराज साहेब खूष झाले होते...

साल्हेरच्या युद्धाचा परिणाम म्हणून सहा हजार घोडे-उंट, सव्वाशे हत्ती, खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट 90 लाखाची मालमत्ता हाती आली होती. 22 सरदार पकडले गेले होते. त्यात अब्दुल मुहम्मद मियाना हा बहलोलखानाचा भाऊ होता. तसेच कोट्याचा राजा माधेसिंह हाडा याचा पाचवा मुलगा किशोरसिंह, काश्मीरचा राजा रावकर्ण, तसेच गुजराथचा राजा मोहकसिंह हा सुद्धा होता. युद्धात मुघलांकडील अमरसिंग चंद्रावत, मेहेरसिंग, पुरणसिंग, सुजाणसिंह, इखलासखान मियाना, नेकीनखान, बहलोलखान हे सरदार मारले गेले होते. विजय तर मिळाला होता पण आपल्याकडील तुकाजीराव गायकवाड व सूर्यराव काकडे हे मात्तब्बर पडले होते. सूर्यराव काकडे यांची समाधी साल्हेरला पश्चिम पठारावर तलावाशेजारी आहे. गिरणेपासून-यमुनेपर्यंत मराठ्यांचा दरारा पसरला होता. पाचही पातशाह्या घाबरल्या होत्या. सुरतेचे व्यापारी धास्तावले होते. सातासमुद्रापार ही बातमी पसरली होती.

हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या असा जिव्हारी लागला कि, सभासद म्हणतो- पातशहा असा कष्टी झाला, खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीस दिधली, असे वाटते. साल्हेरच्या प्रचंड अद्भूत विजयानंतर बहरोजखानाने मुल्हेर तर दौलतमंदखानाने पिसोळ मराठ्यांकडे सुपूर्द केला. साल्हेर किल्ल्यासमवेत 1200 गावांचा बागलाणचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. पुढे एप्रिल 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतः साल्हेरीस येऊन गेले. मुल्हेरची व्यवस्था बागुलांकडे व साल्हेरीची व्यवस्था पवारांकडे लावून लहुजी जाधव यास किल्लेदारपद दिले. पुढे जून 1672 मध्ये मोरोपंत पिंगळेंनी रामनगरचे (धरमपूर)कोळी राज्य व जव्हारचे राज्य जिंकून स्वराज्यात सामील केले.

साल्हेर युद्धाविषयी कवी भूषण म्हणतो,

1) सहितनै सरजा खुमान सलहेर पास कीनौ कुरुखेत खिझी मीर अचलन सौं भूषण भनत करि कुरम बहानौ रण धरणी सुजाण धरीं प्राण दै बलन सौ । अमर के नाम के बहाणे गौ अमरपूर चंदावत लरी सिवराज के दलन सौ । सरजाखां बाच्यो भजि काजी कै बहाणे बाबू राऊ उमराऊ ब्रम्हचारी के छलन सौ ॥90॥

अर्थ : शहाजीपूत्र शिवाजीने साल्हेरजवळ अतिशय क्रुद्ध होऊन औरंगजेबाच्या सरदारांशी कुरुक्षेत्रावर घडलेल्या महाभारताप्रमाणे घनघोर युद्ध केले. सुजाणसिंहने रणभूमीवर कासवाचे सोंग घेतले आणि प्राणांची आहुती दिली. अमरसिंह चंदावत अमरपुरीस गेला. सर्जाखानाने काजीचे सोंग घेऊन स्वतःचे प्राण वाचवले तर बाबुराव उमराव संन्याशी झाला.

2) हेरी हेरी कुटी सलहेर बीच सरदार घेरी घेरी लुटयो सब कटक कराल हे। मान्यो हय हाथी उमराव करी साथ अवरंग डरि सिवाजी कौ भेजत रसाल हें ॥94॥

अर्थ : साल्हेर प्रांतास मोगल प्रमुखास हुडकून काढून ठोकले तर इतर सैन्यास घेरून लुटले, अनेक उमराव, हत्ती, घोडे कैद केल्यामुळे शिवाजीच्या भयाने औरंगजेबाने ही खंडणीच दिली कि काय असे वाटते.

3) गतबल खान दलेल हुव खान बहादूर मुद्ध ।

सिव सरजा सालहेर ढिग कुद्धद्धरी किय जुद्ध ।

कुद्धद्धरी किय जुद्धद्धरी अरि अद्धद्धरी करि ।

मुंडड्डर तहि रुंडड्ड करत उड्डड्डग भरी ।

खेदीद्दर बर छेदीद्दय करि मेदीद्दलि दल ।

जंगज्जति सुनि रंगग्गलि अवरंग तब्बल ॥333॥

अर्थ : या सरजा शिवाजीने अत्यंत क्रोधायमान होऊन साल्हेरजवळ जे युद्ध केले त्यामुळे दिलेरखान हतबल झाला आणि बहादूरखान दिग्मुढ झाला. क्रोधामुळे या घोर लढाईत शत्रूचे निर्दालन झाले. मुंडक्यांचा खच पडला. धडे ओरडत पळू लागली. शत्रू सैन्याची चिरफाड करून चरबी इतस्थत: फेकून दिली. या युद्धाचे वर्णन ऐकून औरंगजेब निस्तेज झाला.

4) जित्यो सिवराज सलहेरी को समर सुनि नर काह सुरन के सिने धरकत हें । देवलोकहू मी अजो मुगल पठानन के सर्जा के सुरज के खग्ग खरकत हें । भूषण भनत भारी भूतन के भौनन में टांगी चांदवतान कि लौथी लरकत हें । कौंउ ना लपेटे अधफरे रन लेटे अजो रुधिर लपेटे पठनेटें फरकत हें ॥417॥

अर्थ : साल्हेरच्या लढाईत शिवरायांचा विजय झाला, हे ऐकल्यावर मानवच काय पण देवदेवतांचीही हृदये धडकू लागली. मुघल, पठाणांवर कोसळलेल्या सर्जा शिवाजीच्या खङ्गाचे खडखडाट आजही देवलोकापर्यंत ऐकू येत आहेत. भूषण म्हणतो, या भूतलावर चंद्रावताची टांगलेली प्रेते अजूनही लटकत आहेत. अर्धमेले, अर्धंखंडीत, रक्ताने न्हालेले पठाण आजही त्या रणभूमीवर तडफडत आहेत.

साल्हेरच्या या महाभयंकर युद्धाच्या खाणा-खुणा आजही साल्हेर परिसरात त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत... अशा या विजयीश्री साल्हेरास नमन करायला एकदा यायलाच हवे ना...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com