'बार्टी’चे करोना काळात 'स्मार्ट वर्क'

489 ग्रामपंचायतीच्या भेटी : 18 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण
'बार्टी’चे करोना काळात 'स्मार्ट वर्क'

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटकाळात बार्टीने स्मार्ट वर्कच्या माध्यमातून समतादूतांमार्फत गावपाळतीवर 59 अनुसूचीत जातींचे सर्वेक्षण सुरु केले आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 489 ग्रामपंचायतींना भेटी, ऑनलाईन संपर्क करुन, व्हाट्सॲपच्या माध्यमातून 18 हजार 112 कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे समतादूत प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी सांगितले.

बार्टिकडून मार्फत अनुसूचित जातीं मधील सामाजिक अथवा शासकीय कोणत्याही प्रवाहात नसलेल्या घटकांची नोंद व्हावी, त्यांचीही प्रगती व्हावी, शासनाचे सर्व लाभ त्यांना मिळावे आणि त्यांचा त्रिस्तरीय दर्जा उंचवावा हा मुख्य उद्देश ठेवून ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी यांच्या मदतीने माहिती संकलनाचे काम समतादूत यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

करोना पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्थिती असतांना देखिल समतादूत विविध उपक्रमांतर्गत प्रशासनास मदत व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करत आहेत. करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका समतादूतांनी तालुक्यातील प्रशासनास मदत व सहकार्य करत आहेत.

त्या अंतर्गत करोनाच्या काळात स्वत:ची काळजी घेत तालुकास्तरावर समतादूतांमार्फत कोरोना आजाराबद्दलची जनजागृती, गरीब गरजू लोकांसाठी रेशन वाटप, रूग्णांसाठी सहकार्य, शासकीय रेशन वाटप दुकानाबाहेर गर्दी होवू नये याकरीता सोशल डिस्टस्टिंग पाळण्याची माहिती दिली जात आहे.

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी प्रशासनाची सर्व मदत यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम या समतादूतांमार्फत करण्यात आले आहे. भितीचे वातावरण घालवण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी समतादूत मदत करत आहेत.

नाशिक जिल्ह्यात समतादूतांनी कोरोना काळात अनुसूचीत जातीच्या सर्वेक्षणाचे काम उत्तमरित्या सुरु केले असून या सर्वेक्षणातून शासनास लाभार्थी वर्ग मिळवून देण्यास अधिकच सोपे झाले आहे.

विविध स्पर्धांचे आयोजन

बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास यासारखे विविध ऑनलाईन क्लासेस राबवित आहे. बार्टीच्या या स्मार्टवर्कचा विद्यार्थ्यांना तसेच बेरोजगारांना निश्चितच फायदा होणार आहे, या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com