बाप्पांचे आज आगमन

घराघरात स्वागताची जय्यत तयारी
बाप्पांचे आज आगमन
Ganpati Bappa

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सन २०२० मधील करोना संकटामुळे अनेक मंडळांनी आपापले गणेशोत्सव रद्द केले. काही मंडळांनी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही. प्रतिवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांच्या संख्येत ८५ टक्के घट झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत लहानमोठ्या १०७ मंडळांनी पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. करोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांश मोठ्या मंडळांनी घेतला आाहे. त्यात अनेक छोट्या मंडळांनी गणेशोत्सवात थेट सहभाग घेण्याचे टाळले आहे. तर निवडणूक काळात निर्माण झालेली अनेक मंडळे गायब आहेत.

आतापर्यंत १०७ मंडळांनी पोलिसांकडून परवानग्या घेतल्या आहे. परवानगी घेतलेल्या मंडळांना गणेशमूर्ती, मंडपाचा आकार अगदीच मर्यादीत ठेवण्याच्या अटी व नियम घालून देण्यात आलेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा शांततेत असणार आहे. शहरात दरवर्षी छोटे-मोठे मिळून सुमारे एक हजारापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करतात. यंदा करोनाचे संकट असून, गर्दी झाल्यास करोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दहा दिवसाच्या कालावधीत काही अनुचीत घटना घडू नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.

तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यास यापूर्वीच ३०० अधिकचे कर्मचारी देण्यात आले असून आयुक्तालयात एसआरपीएफ, शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण पथक, बॉम्बशोध व नाशक पथक यासह विविध तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत,अशी माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त

शुभ मुहूर्त : सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपासून ते ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत.

लाभ मुहूर्त : दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते ३ वाजून ५२ मिनिटांपर्यंत.

अमृत मुहूर्त : दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांपासून ते सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत.

३५ मौल्यवान मंडळे

नाशकात कायमस्वरूपी ३० ते ३५ मौल्यवान गणेश मंडळे आहेत. गणेश मुर्तींना सोने चांदीचे दागिने असल्याने ही मंडळे मौल्यवान ठरतात. मुळात अशी मंडळे ही पारंपरीक असून, मोठ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे त्यांची संख्या कायम राहणार आहे. त्यांच्यासाठी पुर्ण उत्सवकाळात स्वतंत्र पोलीस संरक्षण दिले जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com