घोटी | प्रतिनिधी | Ghoti
खातेदारांनी (Account Holders) क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी दिले असता त्याचा गैरफायदा घेत एका माजी कर्मचाऱ्याने (Bank Employee ) खातेदारांच्या क्रेडिट कार्डवरील मोबाईल नंबर व ईमेल आयडी बदलून त्या क्रेडिट कार्डद्वारे जवळपास २८ लाख रुपये व्यवहार करून बिल न भरता बँकेची व खातेदारांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, घोटी येथील एचडीएफसी शाखेतील (HDFC Branch) एका माजी कर्मचाऱ्याने हा प्रकार केला असून ही बाब निदर्शनास आल्याने विद्यमान शाखा व्यवस्थापकाने माजी कर्मचाऱ्याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी घोटी पोलिसांचे (Police) एक पथक तपासकामी मुंबईला गेले आहे.
घोटी येथील एचडीएफसी शाखेतील शाखा व्यवस्थापक विशाल रामराव हरदास रा. नाशिक, यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजी कर्मचारी स्वप्नील राजन नांदे याने फेब्रुवारी २०२१ ते २७ जुलै २०२३ या कालावधीत बँकेत नोकरीस कार्यरत असताना काही खातेदारांनी त्यांचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी स्वप्नील नांदे याच्याकडे दिले होते.
यावेळी त्याने क्रेडीट कार्डवरील मोबाईल नंबर व ईमेल आयडी बदलून सदरच्या क्रेडीटकार्डद्वारे जवळपास २८ लाख, २७ हजार रुपयांचे व्यवहार करून बिल न भरून एचडीएफसी बँकेचे व खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहा पोलीस निरीक्षक आवारी, उपनिरीक्षक अनिल धुमसे हे पुढील तपास करीत आहेत.