बँक खातेदारांनी डिजिटल व्यवहार करावेत

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निरीक्षक त्र्यंबकेश्वर पोटे
बँक खातेदारांनी डिजिटल व्यवहार करावेत

नैताळे। वार्ताहर Naitale

सध्याच्या संगणक युगातही बँकेच्या ग्राहकाला ( customer of the bank ) आर्थिक व डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. बँकेच्या ग्राहकाला आपल्या स्वतःकडून हाताळला जाणारा बँकेचा प्रत्येक व्यवहार समजून घेतला पाहिजे. बँकेच्या योजना स्वतःसाठी व इतरांनाही समजून सांगण्यासाठी समजणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकेच्या माध्यमातून आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर खरच गरजेचे आहे असे प्रतिपादन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँक निरीक्षक त्र्यंबकेश्वर पोटे (NDCC Bank Inspector Trimbakeshwar Pote ) यांनी केले आहे.

नैताळे येथील प्राथमिक शेती सहकारी संस्थेमध्ये नाबार्डच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिरात पोटे बोलत होते. समाजातील सर्वच घटकांचा आर्थिक विकास होण्यासाठी नाबार्ड अनेक प्रकारच्या योजना विविध संस्थांच्या व बँकाच्या माध्यमातून राबवीत असते. 12 जुलै हा नाबार्ड या आर्थिक पुरवठा करणार्‍या व विविध योजना राबविणार्‍या संस्थेचा 39 वा वर्धापन दिन असून तो साजरा करण्यासाठी नाबार्ड कडून विविध बँकांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकामध्ये आर्थिक व डिजिटल साक्षरता यावी यासाठी अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून शिबिरे राबविली जात आहे.

नैताळे येथील शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, बँकेचे सहा. निरीक्षक रोहीत शिंदे, शाखाधिकारी अर्जुन जाधव, ज्ञानेश्वर सानप, माजी सरपंच सोपान बोरगुडे, सोसायटी सचिव भाऊराव दराडे उपस्थित होते. यावेळी पोटे म्हणाले की, प्रत्येक बँक खातेदाराला एटीएमच्या माध्यमातून पैसे काढता आले पाहिजे. रक्कम ट्रान्सफर करणे या सारखे व्यवहार सहज जमले पाहिजे.

व्याज देणे, मिळविणे हे व्यवहार समजुन घेतले पाहिजे. बँकांच्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, बचत गटाच्या योजना समजल्या तरच बँकेच्या दृष्टिकोनातून तो ग्राहक आर्थिक व डिजिटल साक्षर झाला. अशा प्रकारचे शिबिरे जिल्ह्यात अनेक ठिकाणी राबविले जात आहे. सूत्रसंचालन प्रभाकर घायाळ यांनी केले. याप्रसंगी नामदेव कोटकर, चंद्रभान घायाळ, नामदेव घायाळ, बाळासाहेब भवर, विशाल बोरगुडे, चेतन बोरगुडे, रमजान पठाण, किरण घायाळ आदींसह नैताळे, गाजरवाडी, रामपूर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com