
लासलगाव । वार्ताहर
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने कांदा भावात सुधारणा झाल्याने शेतकर्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी लासलगाव बाजार समिती आवारात बाजारभाव 700 ते 2131 रु. व सरासरी 1800 रुपये राहिले, तर पिंपळगावला प्रतिक्विंटल 2500 रुपये भाव मिळाला.
दरम्यान, कांदा भावात हळूहळू तेजी येत असतानाच आता बांगलादेश सरकारने कांदा आयातीचा परवाना देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कांदा निर्यात होण्याची चिन्हे लक्षात घेऊन कांदा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लासलगाव येथे गुरुवारी दिवसभरात 1 हजार 71 वाहनांमधून उन्हाळ कांदा विक्रीसाठी आला होता. हा कांदा व्यापारीवर्गाने 700 पासून ते 2131 रु. भावाने खरेदी केला. साहजिकच कांद्याला सरासरी 1800 रु. प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची 1,16,205 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान 600 रु., कमाल 2021 रु. तर सर्वसाधारण 1576 रुपये प्रतिक्विंटल होते.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, वणी, पिंपळगाव, सायखेडा, विंचूर, उमराणा, येवला, सिन्नर, देवळा, चांदवड, मनमाड या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होत असून खरीप हंगामासाठी शेतकरीवर्गाला यंदा कांदा आधार देणार, असे चित्र दिसत आहे. दिंडोरी व वणी बाजार समितीत मे महिन्यात जवळपास 80,367 क्किंटल कांद्याची आवक होऊन बाजारभाव साधारणपणे 778 ते 2172 रु. व सरासरी 1450 रुपये इतके राहिले. यापुढेही कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पिंपळगाला 2500 रुपये भाव
पिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती आवारातही कांद्याची 998 वाहनांतून चांगली आवक होऊन बाजारभाव किमान 1000 रु. ते कमाल 2500 रुपये तर सरासरी 1751 रुपये राहिले. गोल्टी कांद्याला 400 ते 1500 रु. व सरासरी 1200 रुपये भाव मिळाला. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला किमान 1990 व कमाल 2190 रु. तर सरासरी 2080 रुपये भाव मिळाला.
निर्यातीसाठी अर्ज मागवले
बांगलादेश सरकारने कांदा आयातीकरता निर्यातदारांकडून अर्ज मागवले आहेत. पश्चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपुष्टात आल्याने आता नवीन कांद्याची आवक सुरू होईपर्यंत भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होते. करोना प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉकडाऊन असतानाही देशातून एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत कांद्याची 14 लाख 4 हजार मे. टन इतकी निर्यात झाली असून कांदा निर्यातीतून 2434 कोटी रुपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला करोनाकाळात परकीय चलन मिळाले आहे. यंदाही कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी कांदा चाळीत साठवणुकीवर भर देत आहेत.