जोरदार पावसाने बंधार्‍याचा भराव वाहून गेला; शेतीचे नुकसान

जोरदार पावसाने बंधार्‍याचा भराव वाहून गेला; शेतीचे नुकसान

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

पहिल्याच संकटातून अजून सावरलेले नसतांना सिन्नर शहराच्या अवतीभोवती असणार्‍या 8-10 कि.मी. परिसराला पुन्हा एकदा सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने झोडपले असून शेतातील उभी पिके पाण्यात वाहून गेली. अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील बांध पाण्याच्या प्रवाहामुळे फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सोनारी परिसरात पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून देवपूर सिन्नरला देवनदीला आलेल्या पुरात शनी मंदिराजवळील बंधार्‍याच्या सांडव्याचा मातीचा भरावा वाहून गेला तर सरस्वती नदीला आलेल्या पूरात पडक्या वेशीवरील फरशीवर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्व:खर्चातून तयार केलेला लोखंडी पादचारी पूलही वाहून गेला.

सिन्नर शहर व परिसराला या पावसाने चांगलेच झोडपले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले. कानडी मळ्याजवळील कोठूरकर मळ्यातील बंधार्‍यांचा सांडवा फूटल्याने रस्त्यावर पुन्हा एकदा पाणीच पाणी झाल्याचे बघायला मिळाले. सकाळी 12 वाजून गेल्यानंतरही रस्त्यावरील हे पाणी वाहतच होते. शिर्डी रोडवरील खोपडीच्या एकमुखी दत्त मंदिराच्या सभामंडपातही पाणी शिरल्याचे यावेळी बघायला मिळाले.

या पावसामुळे देवनदी पुन्हा एकदा दुथडी भरुन वाहतांना दिसू लागली आहे. देवनदीवर निमगाव देवपूर येथे शनि मंदिराच्याजवळ मोठा बंधारा नुकताच बांधण्यात आला असून ग्रामस्थांच्या आग्रहावरुन संबंधीत ठेकेदाराने सोमवारी (दि.17) या बंधार्‍यावरील सर्व 35 दरवाजे बसवले होते. रात्रीच्या पावसानंतर देवनदीला पाणी वाढले आणि दरवाजे बंद असल्याने बंधार्‍याच्या पश्चिमेच्या बाजूने टाकलेला मातीचा भराव पाण्याचा जोर वाढल्याने वाहून गेला आणि सर्व पाणी वाहून गेले. सकाळी मशिनरी आणून भरावा टाकण्याचे काम पुन्हा वेगाने हाती घेण्यात आले होते.

तालुक्यातील सोनारीला पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा जोर अचानक वाढल्याने शेतातील बांध फुटले आणि त्याबरोबर शेतातील पिकेही वाहून गेली. डुबेरे परिरातही पावसाने थैमान घातल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका सोंगणीला आले असून पावसामुळे शेतात शिरणेही अवघड बनल्याने हातात आलेले पिकही डोळ्यासमोर सडतांना पाहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. काही ठिकाणी शेतकर्‍यांनी सोयाबीन सांगून झाकून ठेवला होता. मात्र, पावसामुळे या सोयाबीनचेही नुकसान झाले आहे.

सिन्नर शहरात 1 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात पडक्या वेशीवरील फरशीचा मातीचा भरावा वाहून गेला होता. त्यामुळे पूलावरुन वाहतूक करणे अवघड बनले होते. किमान माणसांना तरी पूलावरुन जाता यावे यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्व:खर्चातून लोखंडी पूल बनवला होता. रात्रीच्या पावसानंतर सरस्वतीला आलेल्या पूरच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला असून काही अंतरावर गाळात रुतलेला हा पूल सकाळी बघायला मिळाला. या फरशीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा लोखंडी पूल संबंधित ठेकेदाराकडून मोकळा करुन ठेवण्यात आला होता. पाण्याच्या प्रवाहात त्यामुळेच हा पूल वाहून गेला.

औंढेवाडीत वीज पडून 6 शेळ्या ठार

तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच असून पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी वीज कोसळून बाळ नामदेव खेताडे यांच्या 6 शेळ्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा भगवान खेताडे याच्या हाताला विजेचा झटका बसला.

भगवान खेताडे हा रानात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी 5 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वीज कोसळल्याने 6 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यावेळी भगवानच्या हातालाही विजेचा झटका बसला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेने काय झाले हेही त्याला कळले नाही. नंतर त्याला शेळ्या मृत झाल्याचे दिसले. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

खोपडीत घरावर वीज कोसळली

तालुक्यातील खोपडी खुर्द येथे सुरेश फकिरबा दराडे यांच्या घरावरवीज कोसळली. यात दराडे यांच्या घराचे सिमेंटचे पत्रे फुटले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com