गावात दारूबंदी करा; अन्यथा धडक मोर्चा

पोलीस-उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना निवेदन
गावात दारूबंदी करा; अन्यथा धडक मोर्चा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या मद्यामुळे गावातील तसेच घरातील शांतता धोक्यात आली आहे. पुरूष-मुले मद्याच्या (Alcohol) आहारी गेल्याने आर्थिक नुकसानाबरोबर (Financial loss) अनेक आजार उद्भवत आहे. या घटनांनी त्रस्त झालेल्या विराणे, ता. मालेगाव (malegaon) येथील महिलांनी वर्षअखेरपर्यंत गावठी दारू निर्मिती (Alcohol production) व विक्री पुर्णपणे बंद न झाल्यास गावातील सर्व महिला धडक मुकमोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व वनविभागाच्या (Forest Department) अधिकार्‍यांना या संदर्भात महिलांतर्फे निवेदन (memorandam) देण्यात येवून वरिल इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील काटवन भागातील विराणे गाव परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भट्ट्या लावण्यात येवून गावठी दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती व विक्री केली जात आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या गावठी दारूमुळे गावातील अनेकांना गावठी दारूचे व्यसन लागल्यामुळे प्राण गमवावे लागले तर अनेकांना वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त व्हावे लागले आहे.

किशोरवयीन मुले देखील सहज व स्वस्त उपलब्ध होणार्‍या या गावठी दारूच्या आहारी गेले आहेत. या मद्यपींमुळे गावाबरोबर घरातील शांतता देखील धोक्यात आल्यामुळे महिला अक्षरश: त्रस्त झाल्या आहेत. अनेकांचे संसार देखील या गावठी दारूमुळे अडचणीत आले आहेत. सदर गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त कराव्यात, अशी मागणी अनेक वर्षापासून गावातील महिलांतर्फे केली जात आहे.

यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदने देखील देण्यात आली आहे. मात्र या निवेदनांची दखल घेण्यात आलेली नसून उलट गावठी भट्ट्या अधिक जोमाने दारूची निर्मिती करत असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. गावठी दारूच्या भट्ट्यांविरूध्द कारवाई व्हावी यासाठी यंदा भाऊबीजेला पोलिसांना दारूबंदीसाठी नारळ पाठवत बहिणीला भेट म्हणून गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त कराव्यात, असे साकडे घालण्यात आले होते. मात्र तरी देखील गावठी दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाई झालेली नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या कविता देवरे यांनी व्यक्त केली.

गावात गावठी दारूच्या अवैध विक्री विरोधात बोलल्यास संबंधितांतर्फे दादागिरी व दमबाजी केली जाते. पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नसल्यानेच गावठी दारू विक्रेते शिरजोर बनले आहेत. संपुर्ण गाव मद्यपिंमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे येत्या 31 डिसेंबरपर्यंत विराणे गावातील गावठी दारू निर्मितीच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात येवून दारू विक्री पुर्णत: बंद न झाल्यास गावातील सर्व महिला मुकमोर्चा काढतील, असा इशारा कविता देवरे यांनी वनक्षेत्र अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन देत दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com