बालभारतीकडे अभ्यासमंडळांची वानवा

बालभारतीकडे अभ्यासमंडळांची वानवा

नाशिक | प्रतिनिधी

अभ्यासमंडळे बरखास्त केल्यानंतर अद्यापही शासनाने नव्या अभ्यास मंडळांवर सदस्यांची नेमणूक केलेली नाही....

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे स्वरूप लक्षात यावे, सरावासाठी साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी स्वाध्याय पुस्तिका तयार करण्याचा निर्णय बालभारतीने घेतला.

मात्र, या पुस्तकांच्या निर्मितीसाठी बालभारतीकडे सध्या अभ्यासमंडळेच नाहीत. त्यामुळे जूनपर्यंत पुस्तिका कशा तयार कराव्यात, असा प्रश्न बालभारतीच्या विद्याविभागासमोर आहे.

पहिली ते दहावीची सर्व पुस्तके बदलल्यानंतर, नव्या शासनाने बालभारतीची अभ्यासमंडळे बरखास्त केली.

अभ्यासमंडळे बरखास्त करून महिना होऊन गेला तरी अद्यापही शासनाने नव्या अभ्यास मंडळांवर सदस्यांची नेमणूक केलेली नाही.

आता येत्या शैक्षणिक वर्षांसाठी (२०२१-२२) विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय बालभारतीने घेतला. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही याबाबत चर्चा झाली.

त्यानुसार येत्या वर्षांत आठवी, दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जूनपर्यंत त्या तयार होणे अपेक्षित आहे. बालभारतीने निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात या पुस्तिकांचे काम करण्यासाठी मंडळाकडे सदस्यच नाहीत.

बालभारतीमध्ये प्रत्येक विषयासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अभ्यासमंडळांनी तयार केलेल्या मजकुराला अंतिम स्वरूप विशेष अधिकारी देतात. त्यातील आठपैकी दोन पदे रिक्त आहेत.

सहाय्यकांच्या पाच पदांपैकीही दोन रिक्त आहेत. अभ्यासमंडळेही नाहीत आणि बालभारतीतही पदे रिक्त अशी स्थिती आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com