सातपुड्याच्या पर्वत रांगेत भरतेय ‘बयडीची’ शाळा

सातपुड्याच्या पर्वत रांगेत भरतेय ‘बयडीची’ शाळा

नाशिक । खंडू जगताप Nashik

आदिवासी बहुल नंदुरबार ( Nandurbar ) जिल्ह्यातील दुर्गम अशा सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी मुलांना ऑनलाईन शिक्षण ( Online Education ) घेणे शक्य नव्हते. मात्र येथील काल्लेखेत पाड्याच्या डोंगरात रोज गुरे राखण्यासाठी जाणारी शाळेची मुलं गुरे चरायला जंगलात सोडून एका बिनभिंतीच्या, टेकड्यांवर, डोंगरदर्यात, नदी नाल्यांच्या काठावर भरलेल्या शाळेत मात्र शिक्षणाचा आनंद लुटत आहेत. हीच ती बयडीची शाळा अर्थात टेकडी शाळा.

करोनामुळे शाळेला सुट्टी असल्याचे माणुन पाड्यावरील मुले रोज गुरे राखण्यासाठी जंगलात जात. गावातील सर्व गुरे एका ठिकाणी जंगलात सोडून देतात, त्या जागेला स्थानिक आदिवासी पावरी बोलीभाषेत बयडी म्हणतात. एके दिवशी अचानक शाळेचे गुरूजी बयडीला हजर होतात. सोबत गुंडाळी फळा, सॅनिटायझर, मास्क, खडू आणि मग भरायला लागते बिनभिंतीची मनसोक्त शाळा.

दिवसांगणिक हिरवाईने नटलेल्या डोंगरांनाही शिक्षणाची बाराखडी ऐकावीशी वाटू लागते. रोज 2 ते 3 तास मुलांसोबत शिक्षक थांबतात. त्यांना हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण दिले जात आहे. पहिल्या दिवशी चार मुले असणार्या बयडीच्या शाळेत गुरुजी रोज येतात समजल्यावर दोनच दिवसात 20 पर्यंत मुले हजर होऊ लागतात. मग सुरू होतो आग्गोबाई ढग्गोबाई, डॉ. कलामांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजीची वर्ड ट्रेन, गणितीय आकडेमोड, सोबत प्रत्यक्ष निसर्गातून भूगोल.

मुले कंटाळू लागली की, गोष्टी सांगणे, एखाद्याचे नक्कल करणे, शब्दांच्या भेंड्या खेळणे, बालगीत म्हणणे, पाढ्यांची शर्यत लावणे, आदिवासी भाषेतील गाण्यांवरून नृत्य करणे अशा अनेक उपक्रमातुन मुले आनंददायी पद्धतीने पुन्हा शिक्षणाकडे वळली आहेत .पाड्यावरच्या गप्पांमध्ये हळुहळु शैक्षणिक गप्पा, अभ्यास कोपरे, अभ्यास गट विषयी चर्चा रंगु लागल्या. यातून हळुहळु पालकांचा सहभाग वाढू लागला. या शाळेतील मुलांना ऊन, वारा, पावस याचा त्रास होऊ नये म्हणून पाड्यावरील कोटा शामसिंग पावरा यांनी मुलांसाठी बयडीतच अभ्यास कुटी बांधून दिली. या शाळेतील मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे, शिक्षक तेगा पावरा, दशरथ पावरा आणि लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी हे उपक्रम राबत आनंददायी शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला.

पालकांचा सहभाग वाढतोय

शिक्षकांनी मुलांच्या घरीच अभ्यास कोपरा, अभ्यास गट, विषय मित्र यासह विविध उपक्रम सुरू केले. पालकांना आपला मुलगा अभ्यास करतोय, घर सजवतोय याचा आनंद वाटु लागला. पालकांमध्ये शिक्षकांच्या शाळेनंतर दिलेल्या वेळेला व धडपडीची चर्चा होत असून आता पालकांचाही सहभाग वाढल्याने मुलांना शिक्षण अधिक आनंदायी वाटू लागले आहे.

लक्ष्मीपुत्र उप्पीन, शिक्षक, काल्लखेतपाडा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com