नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

प्रभाग क्र. 24 मधील स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने त्याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना होत आहे.

नवीन नाशकातील भुजबळ फार्म जवळ असलेल्या एसटीपी सेंटरच्या जागेत उद्यान व क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली. मोठ्या दिमाखात दि. 26 डिसेंबर 2016 रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

या ठिकाणी आ. सिमा हिरे यांच्या आमदार निधीतून ग्रीन जिम देखील बसविण्यात आली आहे. मात्र नवीन नाशकातील या उद्यानाची दुरवस्था झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या ठिकाणी असलेले ग्रीन जिमच्या साहित्य पूर्णतः नादुरुस्त झालेले असून आमदार निधीतून केलेल्या कामामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे मात्र लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास हे काम होऊ शकते.

मात्र अद्यापही हे काम न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सदर ठिकाणी असलेले काही शोभिवंत विद्युत पोल हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. प्रभागातील काही लोकप्रतिनिधींचे निवासस्थान या ठिकाणाहून जवळ असूनही अद्याप पर्यंत हा प्रश्न मनपामध्ये उपस्थित न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उद्यानातील ग्रीन जिम तसेच तुटलेल्या शोभिवंत पथदिपांचीदुरुस्ती करावी व या उद्यानात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.