
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील सोनांबे (sonambe) येथून जात असलेल्या समृध्दी महामार्गाच्या अवजड वाहनांमुळे येथील देवनदीवरील पुलाची (bridge) दुरावस्था झाली आहे. येणार्या पावसाळ्यात हा पुल वाहून जाण्याची भिती ग्रामस्थांनी वर्तवली असून तात्काळ या पुलाची दुरुस्ती (Bridge repair) करण्याची मागणी सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा शनिवारी (दि. 14) समृध्दी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांंनी दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कामासाठी लागणारे गौण खनीज, स्टिल (steel), लोखंड, सिमेंट (Cement) आदी वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची अवजड वाहने सर्रास या रस्त्याचा वापर करतात. या बेकायदेशीर वाहतूकीमूळे (Illegal transportation) पुलाची दुरावस्था झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावाजवळून देवनदी वाहते. एका बाजूला डगळे, बोडके आदी दीड हजार ग्रामस्थांची वस्ती आहे. वस्तीवर जाण्यासाठी देवनदीवर पूर्वीपासूनच पूल अस्तित्वात आहे. जवळून समृध्दी महामार्ग गेल्याने अवजड वाहनांमुळे पूल उध्वस्त झाला आहे.
नदीला पाणी वाहू लागताच पूलही वाहून जाण्यासारखी सध्या अवस्था आहे. त्यामुळे परिसरातील दीड हजार ग्रामस्थांसह शाळेतील विद्यार्थ्यांचा (students) पावसाळ्यात संपर्क तुटणार आहे. पुलाची निर्मिती करण्यासह संरक्षक भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करुनही समृध्दीच्या ठेकेदाराकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
नुकतेच सरपंच डॉ. पवार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी डी. एस. सी. पी. एल. कंपनीचे अधिकारी राजन रघू यांची भेट घेत तात्काळ पुलाची सरंक्षण भिंत व पुलाचे बांधकाम न केल्यास शनिवारी (दि.14) समृध्दी महामार्गाचे काम पुर्णत: बंद पाडण्याचा इशारा दिला. याबाबत कंपनीचे प्रकल्प अधिकारी वेणुगोपाल यांनाही मोबाइलवरुन कळविण्यात आले. यावेळी माजी सरपंच संजय बोडके, दामोदर बोडके, ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार, विकास पवार, सुभाष जोखे, विठ्ठल पवार, संजय पवार, एकनाथ कडभाने, अनिल पवार, अभिषेक वारुंगसे उपस्थित होते.