नाशिक | Nashik

अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन घेताना त्यामध्ये कॉपी करण्याचे प्रकार समोर आले.

त्यामुळे या गैरप्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग विषयांच्या परीक्षेत प्रॉक्टर्ड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कळते.

विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेतली. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये जवळपास एक लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून परीक्षा दिली आहे.

मात्र ही ऑनलाइन परीक्षा घेताना तांत्रिक कमतरतेचा गैरफायदा घेत विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच ऑनलाइन कॉपी कशी करावी याची माहिती देणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुणे विद्यापीठाने विचार सुरू केला. विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी प्रॉक्टर्ड तंत्रज्ञानाचा वापर केला होता.

त्याच पद्धतीने आता अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉक राहिलेला विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.