बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाईन!

बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाईन!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ज्या विद्यार्थ्यांचे गतवर्षाचे/सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा करोनामुळे खोळंबल्या होत्या त्या परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.

सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन घेतली जाणार आहे. दिवाळीनंतर या परीक्षा होणार असून या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्याचे आव्हान विद्यापीठापुढे आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा, बॅगलॉगची परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. साधारणपणे पारंपरिक पदवीसह फार्मसी, इंजिनिअरिंगच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांचे एक आणि त्यापेक्षा जास्त विषय बॅकलॉग राहिले आहेत.

पुणे विद्यापीठातील ही संख्या किमान तीन लाख असण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने सध्या अडीच लाख अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन आणि एमसीक्यू पद्धतीच्या परीक्षेत अनेक अडचणींना विद्यापीठास तोंड द्यावे लागले आहे. मात्र कमी वेळात जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी पुन्हा एकदा याच पद्धतीचा अवलंब विद्यापीठाला करावा लागणार आहे.

तसेच सरासरी गुणांवर पुढच्या वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 16 ते 17 हजार विद्यार्थी या गुणांवर समाधानी नाहीत. त्यांनी श्रेणी सुधारसाठी अर्ज केला आहे. त्यांचीही यासोबत परीक्षा घेतली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com