नॅब महाराष्ट्र हे दिव्यांगांचे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे – बच्चू कडू

नॅब महाराष्ट्र हे दिव्यांगांचे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे – बच्चू कडू

नाशिक | प्रतिनिधी

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड युनिट महाराष्ट्र या संस्थेअंतर्गत असलेल्या अंध मुलींची निवासी शाळा, बहुविकलांग डे केअर शाळा, स्पेशल बी. एड. ह्यांच्या शैक्षणिक कामाची पाहणी दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली. सर्व अत्याधुनिक शैक्षणीक सामग्रीची पाहणी करून शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच दृष्टीबाधीत विद्यार्थिनीनी रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक करून दाखवले ते पाहून ना. बच्चू कडू फारच प्रभावित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये रमले.

राज्यात नॅब संस्था ही आदर्श संस्था म्हणून ओळखली जाते. दिव्यांगांचे शैक्षणिक धोरण, क्रीडा धोरण आणि आरोग्यातील प्रश्नांचे निवारण करण्यासाठी राज्यात ही संस्था दृष्टीबाधीतांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. त्यासाठी अंधांच्या इतर संस्थांशी समन्वय साधून एक अभ्यासपूर्ण प्रकल्प अहवाल शासनाला लवकर सादर करावा.

नॅब हे दिव्यांगांचे शैक्षणिकदृष्ट्या आधुनिक तीर्थक्षेत्र ठरेल त्या दृष्टीने विकास करण्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मिळवून देण्यात मी प्रयत्नशील राहील. अशा भावना ना. बच्चू भाऊ कडू यांनी व्यक्त करून नॅब महाराष्ट्राच्या कार्याने ते प्रभावित होऊन सत्यम शिवम सुंदरम अशा शब्दात संस्थेचा गौरव केला.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामेश्वर कलंत्री यांनी मा. ना. श्री बच्चू भाऊ कडू यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार केला व संस्थेच्या कार्याची माहिती दिली. व्यासपीठावर ना. बच्चू भाऊ कडू, रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री होत्या. संस्थेच्या अनुदानासंदर्भात व इतर प्रश्नांसंदर्भात श्री. रामेश्वर कलंत्री यांनी सविस्तर निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. नॅब ही राज्यात एकमेव शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि क्रीडा या क्षेत्रात एकमेव आदर्श संस्था ठरेल, अशा रीतीने कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात श्री. देविदास नांदगावकर- सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अधिकारी वर्ग, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, नॅबचे पदाधिकारी, प्रा. डॉ. सिंधू काकडे, जयप्रकाश जातेगावकर, सूर्यभान साळुंखे, शाईन शेख सह कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्या सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ना. श्री. बच्चू भाऊ कडू यांनी दिल्या. श्री. गोपी मयूर यांनी आभार तर वर्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com