बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागात लसीकरणासाठी जनजागृती

बागलाणच्या पश्चिम आदिवासी भागात लसीकरणासाठी जनजागृती

मुंजवाड । वार्ताहर

बागलाण तालुक्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा जनजागृती रथाचा शुभारंभ आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्टयात आरोग्य विभागामार्फत सर्वत्र लसीकरण सुरू आहे. मात्र आदिवासीबहुल भागात नागरिकांकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने पंचायत समिती बागलाण व ग्रामसेवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासीबहुल वस्ती, वाड्या तसेच संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

यासाठी जनजागृती रथ तयार करण्यात आला असून त्याचा शुभारंभ पंचायत समिती बागलाण येथे आ. दिलीप बोरसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. सभापती इंदुमती ढुमसे, उपसभापती ज्योती अहिरे, प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी काथपुरे, विस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत, नितीन देशमुख, सूर्यवंशी, ग्रामसेवक संघटनेचे इंगळे यांच्यासह ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे सेवक उपस्थित होते.

करोना चाचणी, लसीकरण या संदर्भात आदिवासींमध्ये समज गैरसमज निर्माण झाले आहेत. याच्या जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला असून या रथावर करोनाची लक्षणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लस घेण्याचे फायदे काय न घेतल्यास तोटे काय याबाबत संपूर्ण माहिती देऊन आम्ही लस घेतली, तुम्ही पण घ्या सुरक्षित राहा, आजार नका काढू अंगावर, लस घ्या दंडावर, राक्षसी करोनाचा विनाश करू या, प्रतिकार शक्तीसाठी लस घेऊ या आदी घोषवाक्य तयार करण्यात आले आहेत.

करोना संकटावर मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. आदिवासी बांधवांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीतजास्त संख्येने लसीकरण करून घ्यावे. खोकला, ताप, सर्दी अशी करोनासदृश लक्षणे दिसत असल्यास घरगुती उपचार न करता तातडीने संबंधित डॉक्टरांकडे जावून योग्य उपचार करून घ्यावेत. लक्षणे दिसताच उपचार करून घेतल्यास प्राणावरील संकट टळू शकते. लसीकरण प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षा कवच असल्याने तालुक्यात जास्तीतजास्त लसीकरण लाभार्थींनी करून घ्यावे, असे आवाहन आ. बोरसे यांनी यावेळी बोलतांना केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com