पोस्ट कोव्हिड रुग्णांसाठी टास्क फोर्सकडून सूचना जारी

म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती करणार
पोस्ट कोव्हिड रुग्णांसाठी टास्क फोर्सकडून सूचना जारी

नाशिक । प्रतिनिधी

पोस्ट कोव्हिड रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्याबाबत गठित करण्यात आलेल्या टास्कफोर्सने या आजाराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोव्हिड रुग्णाला डिस्जार्च देताना या आजाराची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस आजार जनजागृतीसाठी टास्क फोर्स गठित करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मांढरे यांनी टीम गठित करत याबाबत काम सुरू केले. या आजाराचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढत आहे.

जिल्ह्याचे स्तरावर हा विषय हाताळण्यासाठी एक टास्क फोर्स मागील आठवड्यात गठित केलेला आहे. ज्यामध्ये या विषयातील अनेक तज्ञ आहेत. या तज्ञांशी आतापर्यंत दोन बैठका झाल्या व त्यातून झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे ठरले.

या सूचना संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व रुग्णालयांना पाठवण्यात येत आहेत. तसेच टास्क फोर्स मधील निवडक सदस्यांशी चर्चा केली. त्या चर्चेप्रमाणे रुग्णास डिस्चार्ज देताना या आजाराबाबत अवगत करावे व कशाप्रकारे त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी याद्दल सूचनापत्र देण्याचे ठरले. ही कार्यपद्धती यापुढे जिल्ह्यात अनुसरण करणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) काय आहे?

अतिजलद पसरणारा बुरशीचा रोग. जो मुख्यता नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो. परंतु योग्य उपचार न केल्यास रुग्णांना दृष्टी किंवा प्राण देखील गमावावा लागू शकतो.

लक्षणे : नाक कोरडे पडणे, नाकातून तपकिरी व लाल रंगाचा स्त्राव गळणे, डोळ्याभोवती सूज व तीव्र डोकेदुखी, दातदुखी व सौम्य ताप, डोळ्याने कमी दिसणे.

कारणे : अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड अथवा टासिलाझुमंकसारख्या औषधांचा अतिरिक्त वापराचा परिणाम कृत्रिम श्वासोश्वांस मशिनचा अतिवापर प्रमाणाबाहेर प्राणवायूचा वापर रोग प्रतिकारशक्ती कमी असणे.

घ्यावयाची काळजी

मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरवर काटेकोर नियंत्रण करावे.

छोट्या छोट्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये

कान, नाक, घसा तज्ञाकडून एकदा आठवड्यानंतर तपासणी

घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये

डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टेरॉइड न घेणे

टूथ ब्रश / मास्क वरचेवर बदलणे

दिवसातून 2 वेळा बेटाडोनच्या गुळण्या करणे व वैयक्तिक स्वच्छता ठेवणे.

लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करावी

शासकीय अथवा खासगी सेंटरमधून आंतररुग्ण करोनामुक्त झालेले आहेत, अशा रुग्णांनी दर सात दिवसांनी वरीलपैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालये येथे संपर्क साधावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com