नाशकात ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियान

नाशकात ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियान

नाशिक | Nashik

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रात ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान दि. 6 फेब्रुवारीपासून राबविले जाणार आहे.

याअंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांच्या अध्यक्षतेखाली मनपा शहर कृती दलाची (City Task Force) बैठक झाली.

हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्तांनी मार्गदर्शन केले. मनपासह जिल्हा आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग (Social Welfare), जिल्हा परीषदेचा शिक्षण विभाग, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी तसेच आयएमए, आयएपी संघटना या सर्व घटकांचा सक्रीय सहभाग असण्याची सूचना आयुक्तांनी केली. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Medical Health Officer) डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी अभियानाची व्याप्ती, अंमलबजावणीबाबत माहिती दिली. 

या अभियानाच्या (campaign) माध्यमातून बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य तपासणी बरोबरच आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार केले जाणार आहेत. तसेच सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. आठ आठवड्याच्या कालावधीत प्राथमिक तपासणी (Preliminary examination) होणार आहे. तपासणी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, आशा आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे.

हे अभियान शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, खासगी शाळा, आश्रमशाळा, अंधशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खाजगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे या ठिकाणी राबविले जाईल, तसेच शाळा बाह्य मुले-मुली यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये जन्मजात दोष, कमतरता, आजार, विकासात्मक विलंब असे तपासणीचे निर्देशांक असणार आहेत. अभियानाबाबत मनपाच्या आरोग्य विभागामार्फेत (Department of Health) जनजागृती देखील केली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com