नाशिक शहर पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

‘देशदूत’च्या वैशाली शहाणे यांचा समावेश
नाशिक शहर पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर पत्रकार संघातर्फे (Nashik City Journalists Association )मराठी पत्रकार दिनानिमित्त येत्या शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेदहा वाजता मविप्र संस्थेच्या गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील आयएमआरटी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यात ‘देशदूत’च्या वरिष्ठ उपसंपादक वैशाली शहाणे यांचा गौरव केला जाणार आहे.

दरवर्षी दर्पण या पहिल्या मराठी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ 6 जानेवारी रोजी माध्यमकर्मी पत्रकारदिन साजरा करतात. यंदाच्या कार्यक्रमात विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रचिटणीस तसेच नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.

यावेळी शहरातील विविध दैनिकांचे संपादक उपस्थित राहतील. पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी विविध विषयांत उल्लेखनीय लेखन केलेल्या तसेच कामगिरी केलेल्या पत्रकारांचा गौरव केला जातो. यंदा होणार्‍या कार्यक्रमात अझहर शेख (लोकमत), सौरभ बेंडाळे (महाराष्ट्र टाइम्स), संजय चव्हाण (सकाळ), मनीष कटारिया (आपलं महानगर), संकेत शुक्ल (पुण्यनगरी), सचिन जैन (दिव्य मराठी), वैशाली शहाणे (देशदूत), सतीश डोंगरे (पुढारी), चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता) यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव होणार आहे.

पत्रकारदिन कार्यक्रमात शहरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयातर्फे पत्रकारांसाठी वैद्यकीय उपचार, तपासण्या व सहाय्य यासाठी उपयुक्त असलेले प्रिव्हीलेज कार्ड वितरीत केले जाईल. या कार्डचा लाभ पत्रकार आणि त्यांची पत्नी, दोन मुले तसेच आई आणि वडील यांना होईल. पत्रकारदिन कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर पत्रकार संघाचे प्रभारी अध्यक्ष संपत देवगिरे आणि कार्यकारी समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com