पथनाट्यांद्वारे गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर

विविध कलापथकांचा समावेश
पथनाट्यांद्वारे गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर

नाशिक । Nashik

शासकीय योजना तसेच राज्य सरकारने वर्षभरात केलेल्या कार्याची पथनाटयाद्वारे जनतेपर्यंत जागर केला जात आहे. जिल्हाभरात पथनाट्याद्वारे सुरुवात झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने निवड झालेली कलापथके आठ दिवस जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये पथनाट्याचे प्रयोग साकारत आहेत.

प्रयोगामध्ये, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने काय काळजी घ्यावी, राज्य शासनाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा, करोना काळात केलेले कार्य, राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने लोकहितासाठी केलेले कार्य, करोना काळात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच शासनाच्या सर्वच विभागांची भूमिका पथनाट्याद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या गोदावरी नदी प्रदूषणमुक्त कशी राहील याबाबत जनजागृती आदी बाबींचा समावेश असणार आहे.

करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेले नियम व अटी यांचा काटेकोरपणे अवलंब करून संबंधित पथके प्रयोग करत आहेत. भारुड, ग्रामीण संवाद, ओव्या, स्थानिक भाषेचा लहेजा आदी सर्व बाबींनी परिपूर्ण संहितेचा वापर या प्रयोगासाठी करण्यात आलेला आहे.

विविध तालुक्यामधील गावागावांत बाजारपेठांमध्ये, बस स्थानकावर तसेच पंचक्रोशीतील महत्त्वाच्या ठिकाणी नेमून दिलेली आठ पथके पथनाट्याद्वारे जनजागृती करत आहेत. निफाड येथील संजय सुरळी यांचे कुलस्वामिनी लोकप्रबोधन मंच, सटाणा येथील राजेंद्र अहिरे यांचे चिराग पथक, नाशिक येथील सचिन शिंदे यांचे सचिन सचिन शिंदे अकॅडेमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक येथील राजेश साळुंखे यांचे चाणक्य कलामंच,

सातपूर येथील श्रीहरी शिंदे यांचे शाई कला पथक, इगतपुरी येथील बाळासाहेब भगत यांचे बाळासाहेब लालू भगत व सहकारी लोककला पथक, इगतपुरी येथील उत्तम गायकर यांचे आनंद तरंग फाउंडेशन आणि निफाड येथील शंकर वाघ यांचे स्वामी विवेकानंद कलापथक या पथकांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com