कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

बाजार समितीत APMC कांदा Onion विकल्यानंतर शेतकर्‍याचे पैसे देण्याची जबाबदारी बाजार समितीचे असताना तालुक्यातील शेतकर्‍यांनी विकलेल्या कांद्याचे 65 लाख रुपये देण्यास एक व्यापारी onion trader दहा-अकरा महिन्यांपासून टाळाटाळ करीत आहे. या व्यापार्‍यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व बाजार समितीने शेतकर्‍यांना पैसे द्यावेत अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतर विकलेल्या शेतमालाचे पैसे चोवीस तासाच्या आत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. मात्र, बेलू येथील माऊली अ‍ॅण्ड तुपे कंपनी Mauli & Tupe company या बाजार समितीत नोंदणीकृत असलेल्या कंपनीने शेतमाल खरेदी केल्यानंतर दहा महिने उलटूनही शेतकर्‍यांना एक रुपयाही दिलेला नाही. कंपनीचे संचालक निवृत्ती तुपे यांच्याकडे चकरा मारूनही त्याने पैसे न दिल्याने शेतकर्‍यांनी बाजार समिती तक्रार केली. त्यानंतर संचालक मंडळाने व्यापार्‍याला बोलावून घेत पैसे तातडीने अदा करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही व्यापार्‍याने पैसे न दिल्याने शेतकर्‍यांच्या वाढत्या दबावानंतर संचालक मंडळाने व्यापार्‍याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

त्यावर पोलिसांनी व्यापार्‍याला बोलावून घेतल्यानंतर संचालक मंडळ व व्यापार्‍यात पोलिसांसमक्ष बैठक होऊन पैसे देण्यासाठी व्यापार्‍याने मुदत मागून घेतली. ही मुदत संपल्यानंतरही व्यापार्‍याने आजपर्यंत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे दिलेले नाहीत. आम्ही व्यापार्‍याला अथवा त्याच्या कंपनीला ओळखत नसून बाजार समितीने अधिकृत परवाना दिलेल्या कंपनीला आम्ही कांदा विकला आहे. त्यामुळे बाजार समितीने आमच्या कांद्याचे पैसे द्यावेत अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

मुळात कांदा या पिकासाठी बियाण्यापासून खते, मजुरीपोटी मोठा खर्च येतो. हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला तर मोठ्या मुश्किलीने झालेला खर्च वसूल होतो. या भांडवली खर्चासाठी शेतकर्‍याला बँक, सोसायटी अथवा नातेसंबंधात उधार, उसनवार, उचल घेऊन खर्च भागवावा लागतो. कांदा विकल्यानंतर सर्वांचे पैसे देऊन उरलेल्या पैशात इतर पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळतो. मात्र, वर्षभरापासून आपल्या शेतमालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर बाजार समितीचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

बाजार समितीने आमचे पैसे दिले नाहीत, तर नाईलाजाने फसलेल्या सर्व शेतकर्‍यांना बरोबर घेऊन बाजार समितीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढावी लागेल असा इशारा जनार्दन निवृत्ती सोनवणे (1 लाख बाकी), शरद वामन सोनवणे (एक लाख), सोमनाथ शंकर सोनवणे (20 हजार) सर्व रा. शहापूर, संजय तुकाराम सानप (80 हजार), प्रशांत संजय सानप (68 हजार), दोघे रा. भोकणी, अनिल राजाराम आंधळे, मारुती कारभारी आंधळे (दोघांचे 48 हजार) दोघेही रा. खंबाळे या शेतकर्‍यांनी दिला आहे.

बाजार समितीत शेतकर्‍याला व्यापार्‍याने शेतमालाचे पैसे दिले नाहीत तर त्या विरोधात सहकार विभागाच्या न्याय प्राधिकरणाकडे दाद मागण्याची तरतूद आहे. संचालक मंडळाने 30 ऑगस्ट 2021 च्या बैठकीत याबाबत ठराव केला असून प्राधिकरण नेमण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच बाहेरच्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक दर्जाच्या अधिकार्‍यांचे प्राधिकरण नेमले जाईल. ते शेतकर्‍यांचे म्हणणे, पुरावे बघून सुनावणी घेत सदर व्यापार्‍याच्या मालमत्तेवर टाच आणून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळवून देईल. यासाठी बाजार समितीचा पाठपुरावा सुरू आहे.

विजय विखे, सचिव, बाजार समिती

बाजार समितीने व्यापार्‍याच्या विरोधात केवळ दोन वेळा तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी व्यापार्‍याला बोलावून घेतले होते. मात्र, व्यापार्‍याने मागितलेली मुदतवाढ समितीने दिल्याने आम्ही कुठलीही कार्यवाही करू शकलो नाही. समितीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असता तर तो दाखल करून घेतला असता.

संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक

बाजार समितीत विकलेल्या शेतमालाचे पैसे देण्याची जबाबदारी समितीचीच आहे. व्यापार्‍याने पैसे दिले नाहीत तर त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. माजी पोलीस महासंचालक दिघावकर यांनी त्यांच्या कार्यकाळात परप्रांतातील व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करून शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिले होते. इथे तर व्यापारी तालुक्यातला आहे. संचालक मंडळाच्या इच्छाशक्तीच्या अभावी शेतकर्‍यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

अरुण वाघ, माजी सभापती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com