नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग क्रमांक एक,दोन व तीन अशा तिन्ही विभागाने आपापले नियोजन सुरू केले आहे.या नियोजनासाठी सदस्यांना पत्र देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मात्र,सदस्यांकडून कामांबाबतचे पत्र येत नसल्याचे समोर आले आहे. वेळेत नियोजन व्हावे, यासाठी सदस्यांनी तात्काळ आपल्या गटातील कामांचे पत्र द्यावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती तथा उपाध्यक्षांनी केले.

बांधकाम विभागातील नियोजनाबाबत उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता यांची बैठक घेत आढावा घेतला. बांधकामच्या तिन्ही विभागांना दायित्व निश्चित झाले आहे. निधी निश्चित झाल्याने विभागाकडून नियोजनास प्रारंभ करण्यात आला आहे. याकरिता सदस्यांकडून पत्र मागविले जात आहे. सर्व सदस्यांना विभागाकडून पत्र द्या,असे कळविण्यात आलेले आहे. निधी नसतांना सदस्यांकडून कामांची ओरड केली जात होती.

मात्र,आता निधी येऊनही सदस्यांकडून कामांचे पत्र दिले जात नसल्याचे बघावयास मिळत आहे.आतापर्यंत केवळ २५ सदस्यांनी आपल्या गटातील कामे सुचविली आहे. उर्वरित सदस्यांनी अद्यापही गटातील कामांबाबत पत्र दिलेले नाहीत. वेळात नियोजन व्हावे.यासाठी लवकर पत्र द्यावे, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांनी सदस्यांना केले आहे.

समान निधी वाटप

बांधकाम विभागातील निधी वाटपात असमान वाटप होत असल्याने सदस्यांवर अन्याय होत असल्याची ओरड होती. त्यावर सदस्यांनी यातही राष्ट्रवादीचे सदस्य महेंद्र काले व शिवसेनेच्या सविता पवार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत समान निधी वाटप करण्याचा ठराव केला होता. त्यावर, उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांनी निधीचे समान वाटप करण्याची भूमिका घेतली आहे. तिन्ही विभागातील निधीचे सदस्यांना समान वाटप केले जाईल,असे डॉ.गायकवाड यांनी स्पष्ट केले.