पन्नास वर्षापासून प्रसिध्द असेलला होळी विशेष ‘घीहर’

देवळालीत निर्मिती ! वर्षातून चार दिवस होते विक्री
पन्नास वर्षापासून प्रसिध्द असेलला होळी विशेष ‘घीहर’

देवळाली कॅम्प । Deolali Camp

होळीसाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ‘घीहर’ हा जिलेबीच्या प्रकार तयार करून वर्षातून फक्त चारच दिवस त्याची विक्री करण्याची परंपरा येथील चावला परिवाराने आजही अबाधीत राखली आहे.

मिठाई स्ट्रीट हॉटेल असलेल्या जीवनराम चावला यांनी आपल्या पुर्वजांकडून आलेली कला आत्मसात करत खास होळीसाठी आपल्या मिठाईच्या दुकानातून ‘घीहर’ बनविण्याचा उद्योग सुरू ठेवताना पुढील पिढी अनिल व खुशाल चावला यांच्याकडे हा वारसा सोपविला आहे. जिलेबीचा विशिष्ट प्रकार यानिमित्ताने खवय्यांना चाखावयास मिळत असल्याने होळी व धुलीवंदनाच्या दिवशी लष्करासह देवळालीत सर्वधर्मीय नागरिक या ठिकाणी खास हजेरी लावतात.

यंदाच्या वर्षी करोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठ बंद असली तरीही शासनाने दिलेल्या सूचनेनुसार येथील सागर स्वीटस मात्र नियमानुसार खवय्यांसाठी खुले असते. मूळ देवळालीकर असलेले मात्र व्यवसायानिमित्त परगावी रहात असलेले नागरिकही होळीच्या दिवशी खास घीहरचा आस्वाद घेण्यासाठी देवळालीत हजेरी लावतात. तसेच प्रत्येक सिंधी बांधव आपल्या मुलीच्या सासरी हा पदार्थ आवर्जुन पाठवतात. तशी परंपरा या समाजाची आहे.

नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, ओझर, भगूर या परिसरासह साऊथ एअरफोर्स तसेच लष्करातील अधिकारी व जवान मुद्दामहून या ठिकाणी घीहरची चव चाखण्यास हमखास येतात. दिवसभर या ठिकाणी खवय्यांची गर्दी होत असली तरी कोणताही गोंधळ न होता शांततेत सर्वांना या या अनोख्या पदार्थाची चव चाखता येते.

विशिष्ट पद्धतीने ही मिठाई बनविली जात असल्याने याचा घमघमाट दरवळत असतो. अनेक नागरिक या इमरतीची पाककला समजून घेण्यासाठी येतात. मात्र ते आपले ‘सिक्रेट’ असल्याचे सांगितले जाते. चावला यांच्या दुकानात गेल्या कित्येक वर्षांपासून बाळू जाधव हे कारागीर ही कला जोपासत आहेत. त्यांना लक्ष्मीधर व रूपेश यादव यांची मदत होत आहे.

होळीनिमित्त हा पाककलेचा नमुना गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या दुकानातून तयार केला जातो. मात्र त्याची विक्री वर्षभर न करता केवळ चार दिवस करण्याचा संकल्प पुर्वजांनी केला असल्याने ती परंपरा आम्ही जपत आहोत. हा पदार्थ तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ, साखर, वेलची, दुध व इतर पदार्थांचा वापर केला जातो. ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही मिठाई तयार केली जाते.

-अनिल चावला, व्यावसायिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com