कौटुंबिक सुखाबरोबर आरोग्याकडे लक्ष

कौटुंबिक सुखाबरोबर आरोग्याकडे लक्ष

नाशिक । वैभव कातकाडे | Nashik

आरोग्यम् धनसंपदा! या वाक्याचा खरा अर्थ उमगला तो या कोविड (Covid 19) महामारीकाळात. लॉकडाऊनच्या (Lockdown) आणि त्यानंतरच्या काळातही वारंवार हाथ धुवा, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळा.. 2 गज दुरी है जरुरी यांसारख्या अनेक सूचना आता सर्वांच्या अंगवळणी पडल्या आहेत...

लॉकडाऊनमुळे जणू काही रोजच्या धावपळीला छोटासा स्वल्पविरमच मिळाला. याकाळात अनेक नव्या, काही जुन्या सवयी आपण सर्वांनीच स्वतःला लावून घेतल्या. आहाराबाबत स्वच्छता आणि संसर्ग टाळण्यासाठी हॉटेलिंग बंद, बाहेरचे खाणे बंदच होते.

घरचा सात्विक आहार आणि तोही आपल्या कुटुंबासोबत सुरू झाला होता. त्याचबरोबर कधी कधी बाहेरचे पदार्थ घरीच रोज नव्याने बनवण्याचा आणि सर्वांसोबत चाखण्याचा आनंदसुद्धा याकाळात सर्वांनी मनमुराद लुटला.

याकाळात आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारासोबतच व्यायाम, प्राणायाम, योगा याचे महत्त्व जाणून प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात याची एक वेगळी वेळ राखून ठेवली. नेहमी बिझी असल्याने वेळ देणे शक्य नसते, पण लॉकडाऊन काळात भेटी शक्य नसल्या तरी व्हर्च्युअल भेटीगाठीमधून नात्यांची नव्याने सांगड घातली.

या लॉकडाऊनमुळे खरेतर आरोग्याचे महत्त्व समजले. वेळेवर जेवण केल्याने आपल्या शरीरालादेखील वेळेची चौकट मिळाली आहे. शरीरात अगणित क्रिया एकाच वेळी सुरू असतात. त्या चयापचय क्रियांना वेळेवर सर्व गोष्टी साध्य झाल्याने सुदृढ शरीर तयार होत आहे आणि सोबतच रोगप्रतिकारक शक्तीदेखील त्यामुळे वाढत आहे.

लॉकडाऊनमुळे हॉटेलिंग, मसालेदार चमचमीत पदार्थांना आळा बसला असल्याने कित्येकांनी आता घरच्या पौष्टिक जेवणाला प्राधान्य दिल्याचे समोर येत आहे. त्यासोबतच कुटुंबाला वेळ देऊन अन्न समाधानाने आणि आनंदात ग्रहण होत असल्याने अनेक मानसिक आजार आपोआपच दूर झालेले आहेत.

दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार आणि योगाभ्यास या आपल्या आचार्यांनी सांगितलेले महत्त्व आणि त्या जीवनशैलीला दैनंदिन व्यवहारात आत्मसात केल्याने आपण निरोगी आयुष्य किती सहज जगू शकतो, ही शाश्वती सर्वांना नक्कीच आली. वेळेवर जेवण करणे, पुरेशी आणि योग्य वेळी झोप घेणे, सात्विक व पौष्टिक आहार हे शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. शारीरिक सोबतच मानसिक आरोग्य सांभाळणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून योगा, प्राणायाम आणि एकाग्रतेसाठी मेडिटेशन तितकेच महत्त्वाचे आहे.

- डॉ. किरण कातकाडे, एम.डी., आयुर्वेद

Related Stories

No stories found.