नाशिकरोड प्रभाग सभापती पदासाठी रस्सीखेच

नाशिकरोड प्रभाग सभापती पदासाठी रस्सीखेच

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येत्या काही दिवसात नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक( Nashikroad Ward Chairman Election ) होणार असून या पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( Shivsena & NCP )रस्सीखेच सुरू झाली आहे. कारण नाशिकरोडला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महा विकास आघाडी असून नियमानुसार यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पद देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. तसेच शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा असा सूरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

नाशिकरोड विभागात एकूण 6 प्रभागातून 23 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये शिवसेना 11, भारतीय जनता पक्ष 11 व राष्ट्रवादी काँग्रेस एक, याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद सुरू झाल्याने शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली. दरम्यान महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपच्या नगरसेविका सरोज आहिरे यांनी राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक लढविली व त्या विजयी झाल्या. त्यामुळे सदरची जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होऊन महा विकास आघाडी स्थापन झाली.

सदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जगदीश पवार यांना मिळाली व ते प्रचंड मताने विजयी झाले. परिणामी त्यानंतर महापालिकेच्या नाशिकरोड प्रभागाचे समीकरण बदलले. तीन वर्ष भाजपला बहुमत असल्याने भाजपचा प्रभाग सभापती निवडून येत होता. मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्याने त्यांचे पक्षीय बलाबल वाढले व बहुमतसुद्धा महा विकास आघाडीने सिद्ध केले. त्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत जयश्री खर्जुल या निवडून आल्या.

दरम्यान आता महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्यासाठी केवळ सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु प्रभाग सभापती पदाची मुदत संपत असल्याने नवीन निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. परिणामी आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढणार आहे. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली असून या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक जगदीश पवार हे किंग मेकर म्हणून ओळखले जाणार आहे.

शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा व राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पदाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे शिवसेनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. निवडणूक होण्यास अद्याप दहा ते बारा दिवसांचा कालावधी असला तरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पदाची उमेदवारी देईल की नाही याकडे नाशिकरोडवासीयांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com