नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य सरकारने आपल्या सेवक व अधिकार्यांना नवीन ड्रेस कोड लागू केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी नाशिक महापालिकेत करण्याचे आदेश नुकतेच आयुक्त कैलास जाधव यांनी काढले आहे. कार्यालयात टी शर्ट, जीन्स पॅन्ट तसेच स्लिपरला बंदी घालण्यात आली असुन आठवड्यातून एकदा खादी कपड्यांचा पोषाखातून हजेरी लावावी लागणार आहे.

शासकीय सेवकांकडुन कामाच्या ठिकाणी चित्र विचित्र पोषाख करुन कार्यालयात येत असल्याचे दिसत होते. या प्रकारामुळे सेवकांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारी सेवकांना नुकताच नवीन ड्रेस कोड लागू केला. राज्य शासनाने प्रशासनाचा कारभार एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे असावा व कामाच्या ठिकाणी येणार्या सर्वसामान्यांना सेवक नेमकं कोण याची ओळख व्हावी यादृष्टीने ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ड्रेस कोडमध्ये कामावर यावे लागणार आहे. सर्व अधिकारी व सेवकांना शासकीय सेवकास शोभेल असा पोषाख करावा, कपडे व्यवस्थित असावेत, तसेच महिला सेवकांनी कार्यालयात साडी सलवार-कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता किंवा शर्ट आवश्यक असल्यास दुपट्टा आदी पेहराव करावा.

तर पुरुष सेवकांनी शर्ट पॅन्ट, ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम केलेले तसेच चित्र असलेले पेहराव करू नये, अशा सूचना सेवकांना शासनाकडुन देण्यात आल्या आहेत. महिला सेवकांनी शक्यतो चपला, बूट सँडल यांचा वापर करावा. पुरुषांनी बूट व सँडल याचा वापर करावा. मात्र कोणत्याही परिस्थिती स्लीपर घालू नये, असे आदेश आयुक्तांनी काढले आहे. तसेच सेवकांना ओळखपत्र लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.