जि. प. सेवकांची बायोमेट्रिक प्रणालीनेे हजेरी सुरू

जि. प. सेवकांची बायोमेट्रिक प्रणालीनेे हजेरी सुरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कार्यालयीन वेळ सेवकांकडून पाळली जात नसल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नववर्षाच्या प्रारंभीच कालपासून जिल्हा परिषद (Zilla Parishad) , पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) सेवकांची हजेरी (Attendance) बायोमेट्रिक प्रणालीद्वारे (Biometric system) नोंदविण्यास सुरुवात झाली आहे...

सर्वच सेवकांना याची सक्ती करण्यात आल्यामुळे कार्यालय सुरू होण्याच्या वेळेला म्हणजेच सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुख्यालयात सेवकांनी एकच गर्दी केली. मुख्यालयात सुमारे चारशे सेवक असल्याने झालेली गर्दी लक्षात घेऊन अजून एक बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मुख्यालयात शासकीय वेळेत सेवक कार्यालयात हजर राहत नसल्याच्या तक्रारी सदस्यांकडून तसेच कामानिमित्त येणार्‍या ग्रामीण जनतेकडून सातत्याने होत होत्या. त्यामुळे प्रशासनाने बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारपासून सामान्य प्रशासन विभागाजवळ ही बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली आहे.

मात्र, येथे सेवकांची एकच गर्दी होत असल्याने प्रशासनाने लगेचच दुसरीही बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ती मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाबाहेर लावण्यात येणार आहे.

यानंतर तिसर्‍या टप्प्यात नवीन इमारतीत ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे जेणेकरून सेवकांची कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी व कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर एकाचवेळी गर्दी होणार नाही,असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंदराव पिंगळे यांनी सांगितले.

सक्ती अन् शिस्तीला विरोध

कुठल्याही सेवकांना शिस्त ही नकोच असते. याचा प्रत्यही मुख्यालयातील सेवकांकडून आला. प्रशासनाने सेवकांना शिस्त लागावी, यासाठी बायोमेट्रिक प्रणाली आणली आहे, नव्हे तर सक्ती केली आहे. मात्र, सेवकांनाही ही सक्ती आणि शिस्त नकोशी वाटत असल्याने त्यांनी या प्रणालीला विरोध सुरू केला आहे. याबाबत सेवक आपापसात चर्चेतून विरोध करत असल्याचे चित्र सोमवारी मुख्यालयात होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com