
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
यळकोट-यळकोट जय मल्हारचा गजर करत भंडार्याची मुक्तहस्ते उधळण करीत आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास श्रीक्षेत्र चंदनपुरी ( Chandanpuri)येथे शाकंबरी पौर्णिमेस उत्साहात प्रारंभ केला गेला. खंडेराव महाराजांसह भगवती म्हाळसादेवी व बाणाईमातेच्या मुकूटाची तसेच काठीची भव्य पालखी मिरवणूक काढली गेली. पालकमंत्री दादा भुसे( Guardian Minister Dada Bhuse), अनीता भुसे यांच्या हस्ते महापूजा केली गेली. राज्यातून लाखावर भाविक खंडेराव महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाल्याने चंदनपुरी नगरी गजबजून गेली होती.
भंडारा उधळीत मल्हार भक्त खंडेराव चरणी नतमस्तक होत असल्याने मंदिर परिसराने सोनेरी शालू पांघरल्याचे चित्र दिसून आले. पंधरा दिवस सुरू राहणार्या या यात्रोत्सवात लक्षावधी भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दिसून आले. उद्या रविवार असल्याने दीड ते दोन लाखावर भाविक चंदनपुरीत खंडोबा चरणी नतमस्तक होण्यासाठी येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व जय मल्हार ट्रस्ट भाविकांच्या सुविधेसाठी सज्ज झाले आहे.
शाकंबरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास भक्तीभावपुर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ केला गेला. भगवती बाणाई मातेचे माहेरघर असल्याने जेजुरीनंतर मल्हारभक्तांची मांदियाळी चंदनपुरी येथे यात्रोत्सवानिमित्त भरत असते. जेजुरी मल्हार गडावरून आणलेल्या ज्योतीतून मंदिरातील ज्योत प्रज्वलीत केली गेली. यानंतर सकाळी पालकमंत्री दादा भुसे, अनीता भुसे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, वंदना निकम, अ.पो. अधिक्षक अनिकेत भारती आदी मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात येवून खंडोबाची तळी भरली जाताच मल्हारभक्तांनी भंडारा उधळत यळकोट-यळकोट जय मल्हाराचा गजर करत मंदिर परिसर दणाणून सोडला होता. पहाटेपासूनच खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा मंदिर परिसरात लागल्या होत्या.
सकाळी कौतिक अहिरे यांच्या निवासस्थानातून खंडेराव महाराजांसह भगवती म्हाळसादेवी व बाणाई मातेच्या मुकूटाची व काठीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे संपुर्ण गावातून भंडारा उधळीत अभुतपुर्व जल्लोषात भाविक व ग्रामस्थांतर्फे स्वागत केले गेले. भाविकांतर्फे उधळल्या जात असलेल्या भंडार्याने मंदिर व गाव परिसराने जणू पिवळा शालू पांघरल्याचे नयनमोहर दृष्य दिसून आले. राज्यातून आलेल्या भाविकांनी बाणाई मातेच्या मंदिरासमोर नवसपुर्तीसाठी एकच गर्दी केली होती. पुरणपोळीबरोबर बोकडाची आहूती देत भाविक नवसपुर्ती करत होते.
लक्षावधी भाविक उपस्थित राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवात व्यावसायिकांनी देखील दुकानी थाटल्या आहेत. पुजासाहित्यासह गुडीशेव, रेवडीसह जिलेबी, भजी तसेच इतर खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू, कापड, खेळणी आदी दुकानी मंदिर परिसरात थाटण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झाल्याने यंदा चांगला व्यवसाय होण्याची आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याव्दारे लक्ष ठेवण्यासह भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून स्वयंसेवकांची नियुक्ती मल्हार ट्रस्टतर्फे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सतिष पाटील यांनी दिली. ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्यासह स्वच्छता, आरोग्य आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती सरपंच विनोद शेलार, उपसरपंच विनीता सोनवणे यांनी दिली.