वसाका यंत्रसामुग्री हलविण्याचा प्रयत्न उधळला

सभासदांच्या परवानगीशिवाय साहित्य हलविल्यास आंदोलन : आहेर
वसाका यंत्रसामुग्री हलविण्याचा प्रयत्न उधळला

लोहणेर । वार्ताहर

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यात 30 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले टर्बाइन व अलटरनेटर यंत्रसामुग्री धाराशिव कारखान्याने खोलून आपल्या मालकीच्या इतर कारखान्यांकडे नेण्याचा प्रयत्न माजी आ. शांतारामतात्या आहेर यांच्यासह सभासदांनी उधळून लावला. सभासदांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत धाराशीव संचालकांनी नरमाईची भुमिका घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, वसाकाचा कोणताही स्पेअरपार्ट सभासदांच्या परवानगीशिवाय इतरत्र नेण्याचा प्रयत्न केल्यास अवसायक कार्यालयासमोर धरणे छेडले जाईल, असा इशारा माजी आ. आहेर, ज्येष्ठ सभासद पंडितराव निकम यांनी पत्रकार परिषदेत घेत दिला आहे.

वसाका कारखाना 25 वर्षे भाडेतत्त्वावर चालवणार्‍या धाराशिव कारखान्याच्या काही संचालकांनी सुमारे दीड कोटी रुपयांचा चालू स्थितीतील टर्बाइन व अलटरनेटर यंत्रसामुग्री खोलून इतरत्र चालविण्यात येणार्‍या कारखाण्यात नेण्याचा प्रकार सकाळी सुरू केला. ही वार्ता कारखान्यासह परिसरात वार्‍याच्या वेगाने पसरली. हा प्रकार वसाका हितचिंतकांनी कारखान्याचे माजी चेअरमन व माजी आ. शांतारामतात्या आहेर व ज्येष्ठ सभासद पंडितराव निकम यांच्या कानावर टाकले असता त्यांनी वसाकाकडे धाव घेत कारखाना कार्यस्थळावर हजर झाले.

याबाबत प्रत्यक्ष शहानिशा केली असता वसाकाचा टर्बाइन व अलटरननेटर इतरत्र नेत असल्याचे निदर्शनास आल्याने आहेर, निकम संतप्त झाले. याबाबत धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खरे व जनरल मॅनेजर पठाण यांच्याकडे त्यांनी चौकशी केली असता सदर टर्बाइन व अल्टरनेटर आम्ही चालवत असलेल्या सहकारी कारखान्यावर नेत असून काही दिवसांनी परत घेऊन येऊ असे उत्तर दिले. वसाका हा धाराशिव कारखान्याला भाडेतत्वाने दिला असून यंत्रसामग्री इतरत्र नेण्यासाठी दिलेला नाही. अशी कडक भूमिका आहेर यांनी घेतल्याने सदर टर्बाइन व अलटरनेटर अवसायकांच्या परवानगीने नेण्यात येईल, असे सुतोवाच संचालकांनी करताच आहेर यांनी वसाका हा राज्य सहकारी बँकेने तुम्हाला चालवायला दिला आहे.

अवसायक यंत्रसामुग्री इतरत्र देणारे कोण? असा कडक सवाल केला असता धाराशिव संचालकांनी नरमाईची भूमिका घेतली. धाराशिव कारखान्याने वसाकाची कोणतीही यंत्रसामुग्री अथवा इतर साहित्य वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्यास अवसायकांच्या कार्यालयासमोर वसाकाच्या सभासदांसमवेत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आहेर यांनी पत्रकार परिषद घेत दिला आहे.

वसाका धाराशिव कारखान्याला 25 वर्षे भाडे तत्त्वावर चालविण्यास देऊन सभासदांची दिशाभूल करण्यात आली आहे. आजच्या चोरीचे प्रकरण भाडेकरू संस्थेकडून उघड झाल्याने कारखान्याचे नुकसान होत आहे. राज्य शिखर बँकेने आपल्या घेण्यापोटी वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला असला तरी शिखर बँकेचे प्रतिनिधी, अधिकारी व कारखाना कार्यक्षेत्रातील अभ्यासू जाणकार ज्येष्ठ पाच संचालक यांचे प्रशासकीय मंडळ नेमून हा वसाका कारखाना सात वर्षांत पूर्णपणे कर्जमुक्त केला जाईल, असे माजी आ. आहेर यानी यावेळी बोलतांना सांगितले.

साखर कारखाने एकमेकांना लोनबेसिसवर यंत्रसामग्रीची देवाणघेवाण करतात. यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी घेतली जाते. या वसाका कारखाण्यासाठीही दुसरीकडून आम्ही काही साहित्य आणत असतो. कारण असे साहित्य तातडीने बाजारात मिळत नाही. त्यासाठी हा देवाण घेवाणीचा पर्याय स्वीकारावा लागतो. या कारखान्याची कोणतीच वस्तू इतरत्र जाणार नाही.

आबासाहेब खरे

संचालक धाराशीव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com