पंचवटी | Panchavti

आडगाव शिवारातील कोणार्क नगर येथील गणेश मार्केट येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात मंगळवारी (दि. १५) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाले.

त्यांनी या ठिकाणी भाजीबाजार भरविण्यास मनाई केली, कारवाई करण्याच्या तयारी असलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कारवाईला अडथळा निर्माण करीत काही शेतकरी व भाजी विक्रेत्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

कोणार्क नगर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरणारा भाजीबाजार कायम वादाचा विषय ठरत आहे. स्थानिक नागरिकांना या भाजीबाजारामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या जात असल्याने येथे वारंवार अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम राबविण्यात येते. तरीही येथे भाजीबाजार भरविण्याचा अट्टाहास धरला जातो.

मंगळवारी सकाळी हा बाजार भरण्याची तयारी सुरू असताना महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक येथे हजर झाले. त्यांनी येथे भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत त्यांचा भाजीपाला आणि विक्रीचे साहित्य जप्त करून अतिक्रमण विभागाच्या वाहनात टाकण्यास सुरवात केली असता, विक्रेते आणि महापालिका कर्मचारी यांच्या वाद झाले.

हे वाद वाढून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे या बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांनी तेथून काढला पाय घेतल्याने येथे बाजार भरला नाही.

या प्रकरणी पंचवटी विभागाचे अतिक्रमण विभाग प्रमुख मनोहर रामदास सोनवणे यांनी भास्कर टिभू रोकडे (वय ७४), अप्पा भास्कर रोकडे (वय ३५) यांच्यासह आणखी चार जण (त्यांची नावे मिळाली नाहीत) यांच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.