वैद्यकीय अधिकार्‍यावर हल्ला

सामान्य रुग्णालय सेवकांचे कामबंद आंदोलन
वैद्यकीय अधिकार्‍यावर हल्ला

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या किरकोळ जखमी तरुणास केसपेपर काढण्यास सांगितल्याचा राग येऊन त्याने वैद्यकीय अधिकार्‍यास शिवीगाळ, धक्काबुक्की करत कटरने हल्ला चढविला.

या प्रकाराने एकच गोंधळ उडून कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त डॉक्टर्स (doctor) व कर्मचार्‍यांनी घोषणाबाजी करत कामबंद आंदोलन (agitation) पुकारले. शहर पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 5) रात्री 9 च्या सुमारास दोन तरुण सामान्य रुग्णालयात आले होते.

त्यापैकी एक अश्फाक मुश्ताक शहा (25, रा. संजरी चौक, रमजानपुरा) हा किरकोळ जखमी होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ताराचंद पोतदार (Medical Officer Dr. Abhay Tarachand Potdar) हे इतर रुग्णांची तपासणी करीत असतांना अश्फाकने प्रथम माझ्यावर उपचार करा, असा आग्रह धरला. डॉ. पोतदार यांनी, आधी केसपेपर काढून आण, मग उपचार करतो, असे सांगितल्याने राग येऊन त्याने डॉ. पोतदार यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत त्यांच्यावर कटरने हल्ला केला. प्रसंगावधान राखत डॉ. पोतदार यांनी हल्ला परतवून लावल्याने ते बालंबाल बचावले.

अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडून उपस्थित डॉक्टर्स व कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डॉक्टर्स व कर्मचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात आल्याने त्यांनी रुग्णालय प्रवेशद्वारापाशी एकत्र येत घोषणाबाजी करून कामबंद आंदोलन (agitation) सुरू केले. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रताप जाधव, शहर पो.नि. सुरेश घुसर यांनी सहकार्‍यांसह धाव घेत हल्लेखोर अश्फाकला ताब्यात घेतले. त्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी डॉ. पोतदार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सामान्य रुग्णालयात (hospital) डॉक्टर्स व कर्मचार्‍यांशी अरेरावीचे प्रकार वारंवार घडत असून वर्षभरात सामान्य रुग्णालयात अधिकारी व कर्मचार्‍यांवरील हल्ल्याचा हा तिसरा प्रकार होता. याप्रश्नी काल रुग्णालयीन कर्मचार्‍यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेत निवेदन (memorandum) सादर केले. वारंवार घडणार्‍या हल्ल्यांमुळे रुग्णालयीन कर्मचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात आली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच रुग्णालय परिसरात पोलीस चौकी कार्यान्वित करून कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, शहरातील डॉक्टर्स संघटनांसह वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com