रक्षाबंधनाच्या सणावर करोनाचे सावट

विक्रेते निराश
रक्षाबंधनाच्या सणावर करोनाचे सावट

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाच्या सणावर यंदा करोनाचे सावट पसरले आहे. प्रवाशी वाहने बंद असल्याने भावाकडे जाता येत नसल्याने बहिणींमध्ये, तर राखी घेण्यासाठी यंदा अपेक्षित ग्राहक नसल्याने व्यापार्‍यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. सण दोन दिवसावर येवून ठेपला असतांना देखील बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र आज दिसून आले.

करोनाचा उद्रेक सर्वत्र सुरू असला तरी रक्षाबंधन सणाच्या वेळेस सर्व सुरळीत सुरू होईल या आशेवर राखी विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या राख्या खरेदी केल्या होत्या. मुंबई येथे जाता न आल्याने धुळे, नाशिक, नगर आदी भागातून या राख्या व्यापार्‍यांनी भाड्याच्या वाहनाव्दारे विक्रीसाठी आणल्या होत्या. लक्षावधी रूपयांची गुंतवणूक यासाठी व्यापार्‍यांनी दरवर्षी राख्या हमखास विकल्या जात असल्याच्या आशेवर केली होती.

मात्र करोनाचा उद्रेक शहरासह ग्रामीण भागात सुरूच आहे. त्यामुळे एस.टी. बस अथवा रिक्षा, टॅक्सी आदी प्रवाशी वाहने देखील मालेगावी येत नाही. त्यामुळे ग्राहक राख्या खरेदीसाठी मालेगावी येत नसल्याने बाजारपेठा ओस पडल्या असून राखींमध्ये गुंतवलेले भांडवल तरी निघेल कां? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कार्टुन, देव राखी, फॅन्सी, मोटू-पतलू, डोरेमन, छोटा भीम, डायमंड, मेरे भैय्या, भाईराजा आदी विविध प्रकारांच्या राख्या २ ते २५० रूपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. करोनामुळे गत वर्षापेक्षा यावर्षी राख्यांच्या भावात किमान ५० टक्के वाढ झाल्याचे राखी विक्रेते आनंद जैन, मोहन कासार, भानुदास मुसळे, सचिन पारीक, अमोल अमृतकर, जाबीर अत्तार आदी विक्रेत्यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागातील ग्राहक महिला यंदा वाहनांची सोय तसेच करोना संक्रमणाच्या भितीने शहरात खरेदीसाठी येत नसल्याचा मोठा फटका राखी विक्रेत्यांना बसला आहे. शहरातून तुरळक खरेदी होत आहे मात्र यातून भांडवलात गुंतवलेले पैसे देखील निघणार नसल्याची खंत व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com