नाशिक शहरात मनमोहक वातावरण : प्राजक्ता

नरेडको होमेथॉनमध्ये प्रकट मुलाखत
नाशिक शहरात मनमोहक वातावरण : प्राजक्ता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराचे वातावरण ( Atmosphere of Nashik city) इतके सुंदर आणि मनमोहक आहे की, या शहराच्या कोणीही प्रेमात पडू शकते. होमेथॉन प्रदर्शनामध्ये ( Homethon Exhibition)विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्यामार्फत घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा बघून मलाही नाशिकमध्ये घर घेण्याचा मोह होतो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Actress Prajakta Mali ) यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) तर्फे 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 असे चार दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू आहे. सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मुलाखत घेण्यात आली. निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर या मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्राजक्ताने दिलखुलास उत्तरे दिली. याप्रसंगी व्यासपीठावर नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड, वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश टक्कर, जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वय शंतनू देशपांडे व असावरी देशपांडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मुंबईमध्ये आता घर घ्यायला जागा नाही, पुण्यातही प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांचा ओढा नाशिककडे दिसून येतो. त्यातच हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. इतके मोठे प्रदर्शन पहिल्यांदा बघितले, नरेडकोच्या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदी करणारे ग्राहक यांच्यामध्ये एक चांगला दुआ निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पांची माहिती घेतली.

प्रारंभी प्राजक्ता माळी यांचा पैठणी देऊन तसेच चांदीची भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश टक्कर आणि सुनील गवांदे यांनी नरेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्राजक्ता माळींच्या हस्ते पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निर्मिती अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर यांनी केले. आभार शंतनू देशपांडे यांनी मानले.

स्वामीह फंडाची मदत

रियल इस्टेट क्षेत्रास मदत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्वामीह फंडाचे देशभरातील अनेक बांधकाम प्रकल्पांना मोठे सहकार्य लाभत आहे. या फंडातून अर्धवट राहिलेले गृहप्रकल्प तसेच अडचणीत आलेले आणि रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करता येऊ शकतात, अशी माहिती फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांनी दिली. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांना अडचण आल्यास स्वामीह फंडातून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांच्या परिसंवादात ते बोलत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com