
पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
रामतीर्थ व त्याच्या शेजारील कुंडात मोठ्या प्रमाणावर अस्थी पडून आहेत. नदीपात्राचे काँक्रिटीकरण होण्यापूर्वी या अस्थींचे नैसर्गिकरित्या विघटन होत होते. आता अस्थिविलय कुंड नावालाच उरले असून या अस्थी विघटन होत नसल्याने त्या चक्क कचरा डेपोकडे पाठविल्या जात असल्याचा व त्यामुळे देशभरातून आलेल्या लाखो श्रद्धाळू भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचत असल्याचा आरोप गोदाअभ्यासक देवांग जानी यांनी केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामतीर्थाखालील अनेक कुंडातील काँक्रीटचा थर काढण्यात आला. त्यामुळे त्या कुंडातील नैसर्गिक जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित झाल्याचा दावा जानी यांनी केला आहे.रामतीर्थासह अस्थिविलय कुंडातील काँक्रिटीकरणाचा थर काढल्यास त्यांचे आपोआप विघटन होईल, असा दावा देखील यांनी यावेळी केला आहे. सध्या स्वच्छतेसाठी रामतीर्थातील सर्व पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे कुंडातील कचरा नदी काठावर टाकण्यात आलेली मोठ्या प्रमाणावरील फुटकी मटकी यामुळे रामतीर्थसह गांधी स्मारक परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
रामतीर्थातील काँक्रिटीकरणामुळे अस्थींचे विघटन होणे बंद झाले आहे. या ठिकाणी देशभरातून येणार्या श्रद्धाळू नागरिकांचा अवमान आहे. या अस्थी कचरा डेपोत जात असल्याने त्यांच्या श्रद्धेलाच धक्का आहे.
-देवांग जानी, गोदा अभ्यासक
मनपा आयुक्तांकडून पाहणी
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी रामतीर्थ परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन तेथे सुरू असलेली कामासह स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या अस्थीविलय कुंडाबाबतची माहिती घेतली. महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आवेश पलोड, महंत सुधीरदास पुजारी, महंत भक्तीचरणदास यावेळी उपस्थित होते. काही लोक अस्थीविलय कुंडाच्या आजूबाजूला उभे राहून येणार्यांकडून पैसे घेत आहेत तसेच त्यांना अस्थी कुंडात टाकू न देता बाजूला टाकण्यास सांगतात, असा आरोप महंत सुधीरदास महाराज यांनी केला. पंचवटी पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. याबाबत आपण लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.