खर्डेदिगर गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बोलबाला
खर्डेदिगर गटात  इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

कळवण | किशोर पगार Kharde Digar / Kalwan

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खर्डेदिगर गटात ( Kharde Digar Group ) सलग चारवेळा बाजी मारणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( NCP )पाचव्यांदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाला असून विरोधकांचे मात्र आव्हान असणार आहे. गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटात गावनिहाय केलेल्या सार्वजनिक विकासाभिमुख कामांमुळे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य निवडून येण्याची परंपरा पाचव्यांदा कायम राहणार की विरोधक सरसावणार हे येत्या काळात स्पष्ट होणार असले तरी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

गेल्या पंधरवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar )यांनी खर्डेदिगर गटात 25 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ, भूमिपूजन, लोकार्पण करून गाव, वाडी-वस्तीवर नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांशी चर्चा करून कानोसा घेतला. अनेक इच्छुक या दौर्‍यात सहभागी झाल्यामुळे यंदा उमेदवारी ही डोकेदुखी ठरणार असून गटात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

कळवण तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट असून फिरत्या आरक्षणामुळे सन 1997 ची पुनरावृत्ती झाल्याने 2012 च्या निवडणुकीत खर्डेदिगर, कनाशी, अभोणा व मानूर हे चारही गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले होते. खर्डेदिगर गटाचा पूर्वेतिहास बघितला तर सन 1997, 2002, 2007 व 2012 या चार पंचवार्षिकमध्ये या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली. विरोधकांवर मोठ्या फरकाच्या पराभवाची नामुष्की ओढवली. गेल्या चार पंचवार्षिकमध्ये काँग्रेस, माकप, भाजप, शिवसेना यांना या गटातून यश मिळालेले नाही. यंदा मात्र सर्वच पक्षांकडून इच्छुक असून इच्छुकांची भाऊगर्दी असणार आहे.

सन 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयमाला खांडवी, 2007 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा भामरे, 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नितीन पवार, 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी या गटाचे जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केले.

2017 च्या निवडणुकीत खर्डेदिगर गट अनुसूचित महिलासाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या जयमाला खांडवी (अपक्ष), झेलूबाई ठाकरे (भाजप), मीराबाई पवार (शिवसेना), लता बर्डे (माकप), वंदना बहिरम (काँग्रेस) यांचा मोठ्या फरकाने पराभव करून राष्ट्रवादीच्या विजयाची परंपरा कायम ठेवली.

सध्या तरी गेल्या निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस - माकप - काँग्रेस - भाजप- शिवसेना अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. जशजशी निवडणूक जवळ येईल तसतसे चित्र स्पष्ट होईल. 32 गावांचा समावेश असलेल्या या गटातील अनेक गावे गट रचनेत बदलतील शिवाय आरक्षण काय असणार हे निश्चित नाही, मात्र व्हायरल चर्चेत अनेकांची नावे चर्चेत येत आहेत.

त्यात माजी आमदार अ‍ॅड. काशिनाथ बहिरम, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शैलेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, सहकार परिषदेचे सदस्य महेंद्र हिरे, कळवण बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे, माकपचे तालुका सरचिटणीस मोहन जाधव, विसापूर सोसायटी संचालक पंकज जाधव, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ आदी नावे चर्चेत असून गटात 15 ते 20 गावे आदिवासी पट्ट्यातील असल्यामुळे या भागातून कोण उमेदवारी करणार याकडे मात्र लक्ष आहे.

Related Stories

No stories found.