दे. कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर)

लॅमरोड ते भगूर दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या नागझिरा नाल्यावरील रस्ता अतिशय खराब व धोकादायक झाला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणाने रस्ता दुरुस्तीसाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा ठरला.

नाशिक, नाशिकरोड या शहरांसह भगूर व ग्रामीण भागातील 55 गावाची वाहतूक असलेला लॅमरोड कॅन्टोमेन्टकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असला तरी अद्याप या विभागाने रस्ता दुरुस्ती सुरू केलेली नाही. अशातच कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुर्वीच्या ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्ती करून घेतली होती.

मात्र नागझिरा नाल्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने सातत्याने अपघातात होत आहेत. या ठिकाणचा रस्ता लष्करी आस्थापनाच्या ताब्यात असल्याने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नव्हता.

याशिवाय येथून वाहने ने-आण करतांना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.बाळासाहेब आडके यांसह अन्य राजकीय व पंचक्रोशीतील नागरिकांनी येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदनही सादर केले होते.

मात्र आर्थिक कात्रीत सापडलेले प्रशासन या रस्त्यावर डांबरीकरण करण्यास असमर्थता दर्शवित होते.

रस्त्यावर होणार्या अपघातांची संख्या पाहता उपाध्यक्ष सचिन ठाकरे व नगरसेवक भगवान कटारिया यांचेसह सर्व नगरसेवकांनी प्रशासनाकडे याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करत समस्या मार्गी लावण्याबाबत सुचविले होते.

बोर्डाच्या बैठकीतही हा प्रश्न लावून धरला होता. शुक्रवारी सांयकाळी उशिराने या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आल्यामुळे पंचक्रोशीतून समाधान व्यक्त केले जात आहे.