उद्यापासून आश्रमशाळाही होणार सुरु

आदिवासी विकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय
उद्यापासून आश्रमशाळाही होणार सुरु

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात आश्रमशाळातील इयत्ता 5 वी ते 12 वी चे वर्ग 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे (Tribal development commissioner Nashik) यांनी दिली...

करोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. या काळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी (Adv K C Padavi), आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाने शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यात येत आहेत.

आश्रमशाळा या निवासी असल्याने विद्यार्थी शाळेतच राहतात. यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीचा शाळा सुरु करणे बाबतचा ठराव तसेच पाल्याला शाळेत/ वसतिगृहात पाठवण्पूयार्वी पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. वर्ग, भोजनव्यवस्था , निवासव्यवस्था त्यामुळे योग्य ते शारीरिक अंतर ठेवणे आश्रमशाळेत ठेवले जात आहे.

शाळा सुरु करताना ग्रामीण स्तरावर किमान एक महिना आधी कोविड रुग्ण न आढळलेल्या ग्रामपंचायत आणि पालक यांच्याशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरु करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतले असणे आवश्यक आहे. यासोबतच संपूर्ण आश्रमशाळेचा तसेच वसतिगृह यांचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करून गर्दी होणार नाही या दृष्टीने विविध समित्या गठीत केल्या आहेत.

विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था तसेच निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावणे अशा सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या.

शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजनवेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे तसेच संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे या बाबत देखील सूचना देण्यात आल्या.

यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षिक-अधीक्षिका आणि गृहपाल यांचेवर असणार आहे. तसेच अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना स्थानिक परिस्थितीनुसार व जिल्हा प्रशासन यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.