राज्य सरकारविरोधात 'आशां'चा बेमुदत संप

राज्य सरकारविरोधात 'आशां'चा बेमुदत संप

ममदापूर | वार्ताहर

येवला तालुक्यात करोनाचा वाढता प्रदुर्भाव असताना ग्रामीण भागात खेडोपाडी दारोदार जाऊन, करोना संसर्गाच्या काळात आरोग्य सर्वेक्षण ते रुग्णांची सेवा करण्याचे काम आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून केले...

अद्यापही आशा सेविकांना मानधन देण्यात आले नाही. केवळ ३५ रुपये मजुरीवर त्यांना राबवून घेतले जात आहे. त्यामुळे या विरोधात राज्यभरातील आशा सेविकांनी एकत्र येत बेमुदत संप पुकारला आहे.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पूर्ण वर्ष आणि यावर्षीही करोना संसर्गाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणार्‍या ७२ हजार आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही करोनाच्या कामापोटी दिलेली नाही.

केंद्र सरकारकडून करोना भत्ता म्हणून महिन्याला १००० रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जातात. करोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर आदी मिळाले. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते तर काही ठिकाणी अर्धवट वस्तू देत होते.

आशा सेविका घरोघरी जाऊन पल्स ऑक्सिमीटर, ताप मोजण्यापासून आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी केल्या आहे. एका आशा सेविकेला किमान ५० घर रोज करावी लागतात. याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्ण तपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात.

साधारणपणे ८ ते १२ तास काम करून घेतले जाते. त्याबद्दल महिन्याकाठी १००० रुपये म्हणजे रोज ३५ रुपये दिले जातात. आशा सेविका व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी सरकार घेत नाही. त्यांना कोणतेही विमा कवच, आरोग्य संरक्षण नाही. आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जाते.

आशा सेविकांना कोरोना काळात केलेल्या कामाचे किमान १८ हजार रुपये मासिक वेतन मिळाले पाहिजे. पगार वाढ व्हावी आणि नोकरीत कायमस्वरूपी म्हणून सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे.

आशा सेविकांनी गेले वर्षभर कोणतीही तक्रार न करता करोनाची सर्व कामे केली. परंतु या कामांची कुठलीच दखल न घेतल्यामुळे बेमुदत संप करण्याची वेळ आल्याचे ममदापुर, राजापूर येथील आशा गटप्रवर्तक सुवर्णा बैरागी, सुनिता बैरागी, वैशाली दळे, शैला वाघ, सुनंदा शिंदे, छाया पगारे, अरूणा दाणे, कान्ता गरूड, छाया आहेर, मंगल वाघ, प्रितीका घुगे, मंदा डिके, मिरा वाघ, जयश्री भोसले आदींनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com