
नांदगाव । Nandgoan
तालुक्यातील मळगाव येथील आशा सेविकेला मारहाण झाल्याच्या घटनेचा आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा गातप्रवर्तक संघटनेने निषेध नोंदवून संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
नाशिक येथील नातलगांच्या अंत्यविधीसाठी नाशिक सातपूर येथे हजेरी लावलेल्या मळगाव येथील दहा जणांना आशा सेविका रोहिनी आहेर यांनी होम क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. हा राग मनात धरुन रविवारी सकाळी भाऊसाहेब ग्यानदेव आहेर, ग्यानदेव बळीराम आहेर यांनी आशा सेविकेला मारहाण केली होती. याप्रकरणी रविवारी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी घटनेच्या निषेधार्थ शा, आरोग्य सेविकांनी काम बंद ठेवत तहसीलदार उदय कुलकर्णी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, आरोग्य अधिकारी अशोक ससाणे, पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रामाणिक काम करणाऱ्या आशा सेविकेला मारहाण झाल्याने कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही कामबंद आंदोलन करू, असा इशारा आशा सेविकांनी दिला आहे.