निर्बंध शिथिल होताच विविध क्षेत्रातील व्यवसायांत नवचैतन्याचा बहर

निर्बंध शिथिल होताच विविध क्षेत्रातील व्यवसायांत नवचैतन्याचा बहर
USER

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून करोनामुळे राज्यासह शहरात लॉकडाऊन सुरू होता. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर याचा प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र आता निर्बंध शिथिल करण्यात आले असून सर्वच व्यवसाय नव्याने पुन्हा एकदा उभारी घेऊ पाहत आहे.

करोनामुळे सुरक्षित प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी खासगी वाहनाने प्रवास करण्यास नागरिक पसंती देत आहे. त्यामुळेच नवीन वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. अनलॉकमुळे वाहनांचे बुकिंग येत्या काळात वाढेल असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

राहण्यासाठी स्वतःचे चांगले घर असावे असे प्रत्येकाला वाटते आणि करोना काळात तर त्याची अत्यंतिक गरज निर्माण झाली आहे, त्यामुळे घरांचे बुकिंग करण्यास नागरिक प्राधान्य देत आहे. लग्नसमारंभांवर कडक निर्बंध लावण्यात आल्याने तसेच ऐन सण समारंभाच्या तोंडावर लॉकडाऊन असल्याने त्याचा परिणाम साहजिकच सराफ व्यवसायावर देखील झाला होता.

मात्र नियमांमध्ये शिथिलता आल्याने विविध समारंभ सुरू झाले आहे, त्यामुळे ग्राहकांची पावले सराफांच्या दुकानात वळताहेत. याप्रमाणेच अनेक व्यवसाय येत्या काळात हळूहळू पूर्ववत सुरू होतील असा अंदाज विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

अनलॉक झाल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढण्यास सुरुवात झाली असून विविध साईट्सवर चौकशी करण्यासाठी ग्राहक येत आहेत. दैनंदिन कामे रुळावर येण्यास हळूहळू सुरुवात झाली असून पूर्ण क्षमतेने कामगार कामावर परतल्यावर कामांना गती येईल.

- सुशील बागड, संचालक बागड प्रॉपर्टीज

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा सरकारचा खूप चांगला निर्णय आहे. शासनाने घालून दिलेल्या अटी शर्थीचे पालन करून आलेली सर्व मरगळ झटकून आम्ही जोमाने व्यवसायास सुरुवात केली आहे. बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

- निलेश बाफना, संचालक बाफना ज्वेलर्स

लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. असे असले तरी आता पावसाळ्यानंतर शेतीमध्ये उत्पादन चांगले झाल्यास बळीराजा सुखावेल व त्याचा सकारात्मक परिणाम होऊन अनेक उद्योगधंद्यांना सुगीचे दिवस येऊ शकतात.

- अमिश शहा, संचालक जितेंद्र ऑटोमोबाइल्स

प्रत्यक्ष साईटवर ग्राहकांच्या भेटी वाढल्या आहेत. लॉकडाऊन काळात फोनवर किंवा इतर माध्यमातून घर खरेदीच्या झालेल्या चौकशी आता बुकिंगमध्ये परावर्तित होत आहेत. बांधकामासाठी लागणार्‍या कच्च्यामालाची दुकाने उघडल्याने बांधकामास वेग आला आहे.

- रवी महाजन , अध्यक्ष क्रेडाई

स्वतःचे हक्काचे घर आता नागरिकांना हवे आहे म्हणूनच घरांना मागणी वाढत आहे. तसेच बांधकामासाठी लागणार्‍या कच्च्यामालाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे; परिणामी घरांच्या देखील किमती येत्या काळात वाढतील. ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

- निखिल रुंगटा, संचालक रुंगटा गृप

नागरिकांवर यावेळी करोनाचा प्रभाव आणि परिणाम अधिक स्वरूपात बघावयास मिळाला. त्यामुळे त्यातून बरेच जण सावरत आहे. असे असतांना अनलॉकनंतर चांगली सुरुवात झाली आहे. येत्या 1 ते 2 महिन्यात अधिक तेजी बघावयास मिळेल. सध्या गाड्यांच्या सर्व्हिसिंगसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे.

- दिनेश वराडे, संचालक साची होंडा

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी ऑनलाईन बुकिंग केली होती. त्याची प्रत्यक्ष डिलिव्हरी सध्या सुरू झाली आहे. अनेक समारंभ आणि लग्नसोहळे अजून व्हायचे बाकी आहेत,त्यामुळे ग्राहकांची पाऊले सराफ बाजारात वळत आहेत.

- चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष सराफ असोसिएशन

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर यंदा अनलॉक झाल्यानंतर तुलनात्मकदृष्ट्या ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह अधिक दिसून येत आहे. हल्ली सोन्यात गुंतवणुकीवर ग्राहकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे व्यवसायांना यापुढे अधिक तेजी मिळेल.

- शुभंकर टकले, संचालक टकले ज्वेलर्स

बहुतांशी नागरिकांचे लसीकरण झाल्याने त्यांच्यात बाहेर पडण्याची मानसिक ताकद निर्माण झाली आहे. स्वतःची काळजी घेऊन लोक बाहेर पडत आहे. अनलॉक झाल्याने ग्राहकांचा दुकानांत ओघ वाढला आहे.

- कर्नेलसिंह भट्टी, संचालक आयवोक ऑप्टिकल्स

शासकीय आदेशांचे पालन करत साईटवर काही प्रमाणात काम सुरू होते. लॉकडाऊन शिथिल झाल्याने अर्धे कामगार परत आले आहे. येत्या काही दिवसांत सगळे कामगार परततील व पूर्ण क्षमतेने व्यवसाय पूर्व पदावर येतील. ग्राहकांची बुकिंगसाठी चौकशी वाढली आहे.

- साहिल शाह, संचालक पाटील-शाह हौसिंग कंपनी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com