नाट्यकलावंताचा गोळीबाराचा बनाव उघडकीस

कर्जबाजारीपणामुळे केला प्रकार, ग्रामिण पोलीसांकडून अटक
नाट्यकलावंताचा गोळीबाराचा बनाव उघडकीस

नाशिक । Nashik

नाट्यकलावंतावर गोळीबार झाला नाही तर त्याने कर्जबाजारीपणामुळे बनाव केल्याचे ग्रामिण पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. सबंधीत नाट्यकलावंतासोबत त्याचे तीन साथिदारांंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाट्यकलावंत स्वप्निल नंदकिशोर दंडगव्हाळ (रा. कॉलेजरोड), त्याचे साथीदार केशवर संजय पोतदार (25, रा. इंदिरानगर) व रौनक दीपक हिंगणे (31, रा. गुरुद्वारा रोड), आसिफ आमिन कादरी (35, रा. मोठा राजवाडा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

वाडिवर्‍हे शिवारात नाट्यकलावंतावर गोळीबार केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.26) रात्री घडला होता. दंडगव्हाळ हा नाट्यकलावंत एमएच 15 ईपी 1434 क्रमांकाच्या कारने नाशिकला येत होता.

मुंबई आग्रा महामार्गावरील वाडिवर्‍हे शिवारातून जात असताना रायगडनगर जवळील परिसरात दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केल्याचे स्वप्निलने पोलिसांना कळवले.

त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक सचीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, अनिल वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रवींद्र शिलावट, हवालदार बंडू ठाकरे आदींच्या पथकाने तपासास सुरुवात केली.

मात्र स्वप्निलने दिलेल्या घटनाक्रमानुसार व परिसरातील परिस्थितीनुसार विसंगती आढळून आल्या. अखेर कर्जबाजारी झाल्याने कर्ज दिलेले लोक स्वप्निलकडे पैशांसाठी तगादा लावत होते.

सततच्या तगाद्यातून सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार करीत स्वत:वर प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले. तसेच या गुन्ह्यात त्यास साथ देणार्‍या तीघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com