नाशिकरोड | Nashik

सामनगावरोडवरील गाडेकर मळा येथील बालकाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचा खळबळ प्रकार घडला होता.

नाशिकरोड पोलिसांनी या घटनेचा उलगडा चोवीस तासात करत संशयितांना अटक केली. याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संशयित विशाल गेजगे याला अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

याबाबत मुलाचे वडिल लालाबाबू सीताराम यादव (सामनगावरोड, गाडेकर मळा) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा आशय असा की, लालाबाबू यादव यांचा नऊ वर्षाचा मुलगा रामजी यादव याचे काल अपहरण झाले होते. त्यांनी नाशिकरोड पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या.

त्यांनी लालाबाबू यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, शेजारी राहणा-या विशाल विष्णू गेजगे 1 डिसेंबरला ओमनी गाडीत भाजीपाला आणला. त्याची आई वंदना हिला देण्यासाठी हा भाजीपाला आणला होता. विशालने रामजी याला ओमिनी गाडीत नेले होते. मात्र, मुलगा घरी आलाच नाही म्हणून लालाबाबू कामावरुन घरी आले. ते मोटारसायकलीवर पोलिस ठाण्यासमोरील टिळक पथ येथे गेले.

तेथे विशालची आई वंदना गेजगे यांना विचारणा केली. तीने सांगितले की, विशाल हा रामजी व स्वप्निल वसंत सोनवणे याच्यासह ओमिनी गाडीत येऊन गेला. घरमालकाचे किराणा साहित्य घेऊन ते घरी गेले आहेत, असे वंदना यांनी सांगितले.

परंतु, रात्री उशिरापर्यंत लहानगा रामजी सापडला नाही. रात्री दीडच्या सुमारास विशाल गेजगे हा ओमिनी गाडी घेऊन घरी आला. त्यास रामजीबाबत लालाबाबू यांनी विचारणा केली. परंतु, मी रामजीला मंदिराजवळ सोडले होते असे विशालने सांगितले. सकाळपर्यंत रामजीचा शोध लागला नाही. रामजीला पळवून नेल्याचे लालाबाबू यांनी पोलिस तक्रारीत नमूद केले होते. पोलिसांचा विशाल गेजगे व स्वप्निल सोनवणे यांच्यावर संशय वाढला. पोलिसांनी विशाल गेजगे याला ताब्यात घेतले.

रामजीबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता विशाल गेजगे व सोनवणे यांनी सांगितले की, रामजी यादवला घेऊन आम्ही ओमिनी कारमधून शिवाजी पुतळा येथे नेले. तेथे एका इसमास सिन्नर येथे जायचे आहे का अशी विचारणा केली. त्याला गाडीत बसवले.

पुढे गेल्यावर स्वप्निल सोनवणेच्या मदतीने त्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व चार हजार रोकड काढून घेतली. नंतर विशाल व सोनवणे तेथून निघाले. लहानग्या रामजीने लुटीची घटना बघितली होती. त्याने विशालला सांगितले की, तुमने उस आदमी को चाकू लगाके मोबाईल और पैसे क्यू निकाले, मे सब बता दूंगा.

त्यानंतर आपले बिंग फुटेल या भितीने विशालने स्वप्निलला सिन्नरफाटा येथे उतरवले. नंतर रामजीला नायगाव रोडने घेऊन अज्ञात स्थळी नेले. तेथे रामजीचा गळा दाबून खून केला. पोलिसांकडे त्याने विशालने कबूलीजबाब दिला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खून व लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खून प्रकरणात विशाल गेजगे याला अटक करुन नाशिकरोड कोर्टात हजर केले. त्याला पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

लूटीच्या प्रकरणात विशालचा साथीदार स्वप्निल सोनवणेला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, गणेश न्यायदे आदींनी भेट दिली.

पुढील तपास बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश न्यायदे व सहाय्यक निरीक्षक शेळके करत आहेत. संशयित विशालला कडक शासन करण्याची मागणी उत्तर भारतीय नागरिकांना बिजली यांना भेटून केली.