वावी । वार्ताहर Vavi

कहांडळवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवाने मनमानी पद्धतीने व्याजाची आकारणी केली असल्याचा आरोप संस्थेच्या सभासद शेतकर्यांनी केला असून संस्थेच्या एकूणच व्याज आकारणीची चौकशी करावी व संस्थेची वार्षिक सभा तातडीने आयोजित करावी अशी मागणी संस्थेच्या सभासद शेतकर्यांनी सहाय्यक निबंधंक संदिप रुद्राक्ष यांना निवेदन देत केली आहे.

सोसायटीचे संचालक संजय विठ्ठल उगले यांनी 2011 साली राजीव गांधी घरकुल योजने अंतर्गत जवळपास 90 हजारांचे कर्ज घेतले होते. त्याच्या व्याजापोटी 21 हजार रुपयांची आकारणी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर दुसरेे सभासद माधव दगडू कहांडळ यांनीदेखील 2010 मध्ये राजीव गांधी घरकुल योजनेअंतर्गत जवळपास 90 हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र, सचिवाने कहांडळ यांना केवळ 5 हजार रुपये व्याजाची आकारणी करण्यात आली.

अशा प्रकारचे कर्ज जवळपास 35 शेतकर्यांना वाटप केल्याचे समजते. यातील काही शेतकरी थकीत असल्याचेही समजतेे. काही शेतकरी या कर्जाचा भरणा करण्यास तयार आहेत. मात्र, अनाठाई व्याज आकारणीमुळे ते भरणा करत नसल्याचे समजते. संस्थेच्या सर्व कर्जदारांच्या व्याज आकारणीची चौकशी करावी व संस्थेचे वार्षिक सभा तातडीने आयोजित करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सुनील पवार, पुंजाहारी कहांडळ, बबन कहांडळ, अण्णासाहेब कहांडळ, अशोक घेगडमल, विठ्ठल उगले, जालिंदर कहांडळ यांच्या सह्या आहेत.

सोसायटीत व्याजदर आकारणी करताना संबंधित सचिव हा मनमानी व्याजदर आकारात आहे. संबंधित सचिवाकडे वावी, कहांडळवाडी, पिंपरवाडी येथील सोसायटीचे कामकाज आहे. सोसायटीचे दप्तर तपासणे गरजेचे आहे.

सुनील पवार, सभासद

कहांडळवाडी सोसायटीचे निवेदन माझ्याकडे आले आहे. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येईल. व्याजदर आकारणी जास्त झालेली असेल तर त्याचे संपूर्ण दप्तराचे ऑडिट करण्यात येईल व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.

संदीप रुद्राक्ष, सहा.निबंधक