दाभाडी । वार्ताहर Dabhadi

हिरे गटाच्या चारूशिला निकम यांना पहिल्या लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला होता.

अंतर्गत नाराजी, सदस्यांच्या फोडाफोडीचे राजकारणामुळे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेणार्या दाभाडी ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच चारूशिला निकम यांच्याविरुध्द सत्ताधार्यांसह शिवसेनेच्या सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव 14 विरूद्ध 2 मतांनी मंजूर झाला. हिरे गटाच्या आठ सदस्यांनी शिवसेनेस दिलेल्या समर्थनामुळे हा अविश्वास मंजूर होवू शकला आहे.

दाभाडी ग्रामपंचायतीच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत हिरे गटाचे 10 तर सेनेचे 7 सदस्य निवडून आले होते. हिरे गटाच्याच चारूशिला निकम यांना पहिल्या लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून सरपंचाविरूध्द सत्तारूढ गटातील सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता.

उपोषणासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांपर्यंत तक्रारींचा पाऊस पाडला गेल्याने त्यांनी सरपंचाच्या चौकशीचे आदेश देखील काढले होते. या वादामुळे सरपंचपदाची अवस्था खो-खोच्या खेळासारखी झाली होती. सरपंच निकम यांच्या विरोधात सेनेतर्फे सर्व नाराज सदस्यांना एकत्र आणले. उपसरपंच सुभाष नहिरे यांनी 13 सदस्यांसह तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

तहसीलदार चंद्रजितसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात येवून गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 14 मते तर विरोधात 2 मते पडली. सदर सभेत 2 सदस्य गैरहजर राहिलेत.

सदर ठराव संमत झाल्याचे राजपूत यांनी घोषित करताच सदस्यांनी बाके वाजवून जल्लोष केला. सभेसाठी सर्कल अधिकारी रवींद्र शेवाळे, तलाठी पंकज पगार, ग्रामसेवक सुरीतराम शिरोळे यांनी सहाय्य केले. अनुचित प्रकार घडू नये यास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.